सरपंच पुनम वाटेगांवकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान अंतर्गत २१ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. अशी माहिती सरपंच पुनम वाटेगांवकर यांनी दिली.
कुंभारमाठ गावातील माळरानावर कातकरी आदिवासी कुटुंबे हि गेली अनेक वर्षे झोपड्या बांधुन वास्तव्यास आहेत. त्या कुटुंबियांकडे निवाऱ्याच साधन नसल्याने गेली अनेक वर्षे ऊन वारा पाऊस अशा भयावह अवस्थेत वास्तव्य करत आहेत. या कातकरी कुटुंबियांना स्वत:ची घरकुले मिळावीत यासाठी कुंभारमाठ ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शासन स्तरावर पाठपुरावा करत होती.
ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. पुनम वाटेगांवकर यांच्या मागणीनुसार आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत साहेब यांनी शासन दरबारी विशेष पाठपुरावा केल्याने सर्वांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले.
यापुर्वीचे सरपंच, उपसरपंच व कार्यकारिणी तसेच तत्कालिन ग्रामसेवक तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व कार्यकारीणी मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कुंभारमाठ ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम यांनीही सातत्याने प्रयत्न केले.
विद्यमान सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत कार्यकारीणी तसेच ग्रामपंचायत अधिकारी हे या कातकरी कुटुंबियांना घरकुलाच्या जमीनीसाठी प्रयत्नात असताना महसुल दप्तरी कागद पडताळणी दरम्यान कुंभारमाठ मध्ये शासकीय मालकीचे काही भुखंड असल्याचे निदर्शास आले. सदर भुखंडांपैकी काही जमीन या कुटुंबियांच्या घरकुलांसाठी मिळावी या उद्देशाने ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला.
जिल्हाधिकारी यांनी दोन भुखंड संबंधित कुटुंबियांना घरकुलासाठी ताब्यात दिले.
याच भुखंडामध्ये शासनाच्या "प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महा अभियान (JANAMAN) सन २०२५-२६" या योजने अंतर्गत २१ घरकुलांचे एकत्रित बांधकाम चालू झाले आहे. या घरांच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते पार पडला.
सदरची घरे ही गतिमान पध्दतीने लवकरात लवकर पुर्ण केली जाणार आहेत. यासाठी उपसरपंच जीवन भोगावकर, मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, कुंभारमाठ ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य मेहनत घेत आहेत. सदर कातकरी कुटुंबांसाठी पुढे शासनाच्या माध्यमातून लाईटची व्यवस्था, विंधन विहिर खोदाई करुन नियमित पाणीपुरवठा व इतर सुविधा करण्यात येणार आहेत. असे कुंभारमाठ सरपंच सौ. पुनम वाटेगावकर यांनी माहिती देताना सांगितले.
▪️अमित खोत, मालवण

