शिवकालीन नाणी आणि साहित्य प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण: महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच सामाजिक आणि न्यायिक सक्षमीकरण या उदात्त हेतूने आयोजित 'माता मेळावा' उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव, श्री रामेश्वर प्राथमिक शिक्षण शाळा तळगाव येथे माता-भगिनी मेळावा तसेच शिवकालीन नाणी आणि साहित्य यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांच्या हस्ते झाले. महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी श्री रामेश्वर विद्यालयाचे विशेष कौतुक केले. अश्या मेळाव्यातून खर्या अर्थाने गावातील माता-भगिनींचे सक्षमीकरण होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.

या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित सिंधुदुर्ग पोलीस दलातील सायबर विभागातील कु. जावकर यांनी सायबर गुन्हे आणि दक्षता यावर मार्गदर्शन केले. श्रीमती ज्योती पंडित महिलांचे आरोग्य आणि योग यावर मार्गदर्शन केले. श्रीमती उज्ज्वला धानाजी यांनी स्त्री काल, आज आणि उद्या यावर मार्गदर्शन केले. श्रीमती गीता काळे यांनी महिला अत्याचार पोक्सो कायद्याविषयी माहिती दिली. श्रीमती दर्शना कोलते महिला व भगिनी आरोग्य या विषयांवर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्ष उत्तम दळवी, सरपंच लता खोत, माजी मुख्याध्यापक प्रदीप शिंदे, मुख्याध्यापिका सौ. शिरोडकर, सेवानिवृत्त शिक्षक अरुण मुळीक, पंडित माने यांसह अन्य उपस्थित होते.
मेळाव्यासाठी गावातील तसेच पंचक्रोशीतील महिला सहभागी झाल्या होत्या. या मार्गदर्शनातून खूप चांगली माहिती मिळाली. तिचा ऊपयोग आम्हाला आमच्या पुढील आयुष्यात होईल असे ही उपस्थित महिलांनी सांगितले.
शिवकालीन नाणी आणि साहित्याचे प्रदर्शन

या मेळाव्या सोबतच विद्यालयाचे माजी विद्यार्थी सर्वेश दळवी व राघो तळगावकर यांच्या संकल्पनेतून व ओंकार विठ्ठल कदम यांच्या संग्रहातून शिवकालीन नाणी आणि साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला देखील ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सांगता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शैलजा शिरोडकर यांनी आभार व्यक्त करून केली.
▪️ अमित खोत, मालवण

