वनभोजनातून सामाजिक एकोपा : हिर्लेवाडीच्या निसर्गात श्री बाळगोपाळ मंडळ झाले रममाण
स्काय न्यूज टुडे
आचरा : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आचरा गावातील अनेक रूढी परंपरा, संस्कृती, सण सोहळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. बारा वाड्यांच्या गावात सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने नांदत आहे. याचाच एक भाग असलेले आचरेमधील वरचीचावडी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे आपल्या वाडीतील अबालवृद्धांना एकत्रित करून वन भोजनाच्या निमित्ताने सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतात.
आचरा वरचीचावडी येथील श्री बाळगोपाळ मंडळ हे आचरा पंचक्रोशीत नावाजलेले मंडळ आहे. दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते. वर्षभर या मंडळाच्या माध्यमातून आरती, भजन, दिंडी भजन, गरबा, गोमू नाच यासारख्या अनेक उपक्रम राबविले जातात. यात सर्वजण एकोप्याने आणि एकदिलाने देत असलेले योगदान सामाजिक बांधिलकीचा संदेश देते.
वर्षभर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेले वरचीचावडी (बाजारपेठ) येथील ग्रामस्थ म्हणजेच श्री बाळगोपाळ मंडळातील ज्येष्ठ मंडळी, महिला, पुरुष, बच्चे कंपनी यांनाही रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काहीसा विरंगुळा मिळण्यासाठी वन भोजन आणि वार्षिक स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हिर्लेवाडी येथील प्रदीप पेडणेकर यांच्या प्रशस्त माडांच्या बागेत आणि समुद्राच्या कुशीत वनभोजन पार पाडले. यात अबालवृद्ध तसेच महिला वर्ग वनभोजनात दंगुन गेले. जेवण बनविण्यापासून ते प्रत्येक जण आपापल्या दुनियेत हरपून गेला होता.
महिलांनी जेवण लगबगीने करून धम्माल करण्यास सुरुवात केली. यात कबड्डी, रस्सीखेच, गाण्यांच्या स्पर्धा, नवीन गाण्यांवर नृत्य, लगोरी आदी मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले. यात साठ-सत्तर वर्षांच्या आजीबाईदेखील मोठ्या उत्साहात सहभागी होऊन जणू आनंदोत्सव साजऱ्या करत होत्या. तर दुसरीकडे बच्चेकंपनी क्रिकेट खेळण्यात व्यस्त होती. पुरुष मंडळी गाणे गात होती तर क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळ खेळून निसर्गाच्या सान्निध्यात रममाण झाले.
बॉक्स - बहारदार स्नेहमेळावा
आचरेतील पत्रकार, प्रतिष्ठित व्यक्तींनी वनभोजन अर्थात स्नेहमेळाव्यास उपस्थिती दर्शवून श्री बाळगोपाळ मंडळाचे अबाधित राखलेल्या एकीचे कौतुक केले. यावेळी सहभोजनाच्या पंगतीही महिला पुरुष यांच्यात असलेला समन्वय अधोरेखित करत होती. वर्षांनुवर्षे हा स्नेहमेळावा बहारदार ठरत आहे.

