मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास
मालवण | प्रतिनिधी : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना उमेदवार यांनी सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभाग क्रमांक चार मध्ये शिवसेनेच्या उमेदवार पूनम चव्हाण यांनी प्रभागात रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रभागात मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असून प्रभागात शिवसेना नगराध्यक्षा उमेदवार सौं. ममता वराडकर यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालवण दौऱ्यानंतर शहरात शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचे मनोबल कमालीचे वाढले असून त्यांच्यात उत्साह संचारला आहे. गेले दहा दिवस शिवसेनेच्या उमेदवारांनी आपापल्या प्रभागात प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली आहे. यात प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवार पूनम चव्हाण यांनी या प्रभागात चांगलीच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रभागातील विविध समस्यांची त्यांना जाण त्यांना असून गेल्या दहा वर्षांत त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न पाहता मतदारांचा कौल त्यांच्या बाजूने झुकला असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पूनम चव्हाण यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व या प्रभागाला मिळाले आहे. त्यामुळे त्यांना आबालवृद्धांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज पूनम चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रभागात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार रॅली काढली. मातदारांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे पुनम चव्हाण यांनी सांगितले.

