शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा मोंडकर यांना इशारा : पत्रकार परिषदेतून मांडली रोखठोक भुमिका
मालवण | प्रतिनिधी : स्वतःच्या फायद्यासाठी सेटलमेंट करणाऱ्या बाबा मोंडकर यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आजपर्यंत तुम्ही अनेक फ्रॉड केले हे सर्व उघड करणार. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मोंडकर यांना दिला. तसेच आमची लढाई भाजपाशी नाही मोंडकर या प्रवृत्ती विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, 2014 साली भाजपच्या कमळ निशाणीवर विधानसभा निवडणूक लढवितांना गद्दारी करून भाजपाला फसवले गेले. देवबागमध्ये कुठे पैसे घेतले गेले याचेही पुरावे आपल्याकडे आहेत. असेही दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सडेतोड भुमिका मांडली. यावेळी माजी सभापती सुनील घाडीगावकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, मकरंद राणे, राजन परुळेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, मी उभारलेला क्रशर हा बँकांची कर्जे काढून उभारलेला आहे. शासनाच्या सर्व नियमानुसार माझा अधिकृतपणे व्यवसाय सुरू आहे. माझ्या क्रशरमधून निघालेला एकही डंपर कधीही पास नाही, म्हणून महसूल यंत्रणेने पकडलेला नाही. खासदार नारायण राणे साहेब यांची शिकवण आम्हाला आहे.
अधिकृतपणे काम करणारा मी व्यावसायिक आहे. माझे नेते आणि दैवत एकच नारायण राणे आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आशिर्वादाने मी सर्व पदांवर आणि राजकारणात कार्यरत आहे.
मोंडकर यांनी मी केलेल्या आरोपावर सर्वप्रथम अभ्यास करून बंदर जेटीवरील सर्व स्टॉलधारकांना एकत्रित करून माझ्या आरोपांचे खंडन केले असते तर मी माझे आरोप मागे घेतले असते. मात्र माझ्या आरोपांवर एक प्रसिद्धीपत्रक तयार करून त्यांच्यावर दबाव टाकून सहया घेण्याचा प्रकार सुरु होता, यातच सर्वकाही समजून येत आहे. जे प्रसिद्धीपत्रक तयार करण्यात आले आहे ते त्याच पदाधिकाऱ्याने केलेले असल्याने आपली बाजू मांडण्याचा हा केविलवाणा प्रकार असल्याचीही टिका श्री. सामंत यांनी केली.
न्यायप्रविष्ठ विषयावर आम्ही भाष्य करणार नाही
भाजप कार्यकर्त्याच्या घरात सापडून आलेले पैसे हे त्याच्या व्यवसायातील असतील असे भाजप जिल्हाध्यक्ष यांनी सांगितलेले जनतेला पटणार आहे का? तसेच भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या जातप्रमाणपत्रावर उपस्थित करण्यात आलेली हरकतही निकाली काढण्यात आल्याचे भाष्य भाजप जिल्हाध्यक्ष यांनी केले आहे. यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष सध्या जिल्हाध्यक्ष राहिलेले असून ते न्यायाधिश बनले आहेत का? असा सवाल श्री. सामंत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आता आम्ही या विषयावर काही बोलणार नाही, आमदार नीलेश राणे हे न्यायालयात गेलेले आहेत, यामुळे न्यायप्रविष्ठ विषयावर आम्ही आता भाष्य करणार नाही, असेही श्री. सामंत म्हणाले.
आमदार नीलेश राणे यांचा सुसंस्कृतपणा
काल स्टिंग ऑपरेशन करताना बेहिशोबी रक्कम सापडली त्याबद्दल प्रशासकीय यंत्रणांनी चौकशी करावी अशी मागणी केली होती. आमदार कुठेही चुकीचे नव्हते, पोलीसांना बोलवून माहिती दिली. केनवडेकर यांच्या घरातील पैशांनी भरलेली बॅग पत्रकार आणि पोलिसांना दाखविली. त्याठिकाणी दिसून येणाऱ्या व्यक्ती केनवडेकर यांच्याकडे फ्लॅट घ्यायला गेले होते का? असाही सवाल श्री. सामंत यांनी उपस्थित केला आहे.
मालवणची जनता आमदार निलेश राणे यांच्या सोबत
एक अभ्यासू आमदार म्हणून निलेश राणे यांचे नाव सगळीकडे घेतले जात आहे. मालवणच्या विकासाची तळमळ त्यांच्या क्षणाक्षणाला दिसून येत आहे. ते उच्चशिक्षीत असून येथील तरूणांना रोजागर मिळण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. मालवणच्या जनतेने त्यांच्या हात मजबुत करण्यासाठी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. आमदार नीलेश राणेंना चक्रव्यवाहमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे मालवणच्या जनतेने आमदार नीलेश राणे यांच्यावर विश्वास टाकून मालवणच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांसह सर्व शिवसेना नगरसेवक उमेदवार यांना विजयी करावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले आहे.
▪️अमित खोत, मालवण

