सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी व्यक्त केल्या उत्स्फूर्त भावना
मालवण : सौं. शिल्पा यतीन खोत सामाजिक भान असणारे लोकनेतृत्व आहेत. रक्तदान व सामाजिक कार्यात त्यांचे बहुमोल असे योगदान आहे. अश्या उत्स्फूर्त भावना सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी व्यक्त केल्या आहेत.
सौ. शिल्पा यतीन खोत म्हणजे सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची एक प्रामाणिक आणि क्रियाशील सदस्य. रुग्णांप्रती असणारी त्यांची तळमळ ही अत्यंत संवेदनशील आहे. प्रथम जेव्हा मी त्यांना पाहिलं आणि भेटलो होतो, तो मालवण येथील महिलांच्या रक्तदान शिबिरात, जवळ जवळ ५६ महिला प्रत्यक्षपणे त्या शिबिरात सहभागी झाल्या होत्या, रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमात महिलांचा सहभाग आणि विशेषतः शिल्पा खोत यांचा उत्सपूर्त प्रतिसाद पाहून, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानसाठी एक ताकदीचे नेतृत्व आणि कार्यकर्ती सापडल्याचा साक्षात्कार झाला आणि काही दिवसातच शिल्पा खोत यांनी प्रतिष्ठानसाठी मालवण तालुका अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली, तिही आजवर यशस्वीपणे.
रक्तदान देहदान अवयवदान रुग्णमित्र अशा सुत्रीवर आधारीत चळवळ चालवणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कामाला न्याय देण्याचं काम त्यांनी छान केलं.
रक्तदानाची मागणी पूर्ण करताना, त्यांनी केलेली धावपळ, जीएमसी गोवा किंवा कोल्हापूर अशा ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी सतत पाठपुरावा करुन सेवा मिळवून देण्यात त्या नेहमीच सक्रीय राहिल्यात. पर्यावरण आणि प्राणीमित्र म्हणूनही त्या कार्यरत आहेत. महिलांचे विविध समाजोपयोगी कार्यासाठी संघटन त्यांनी बांधले आहे.
नेमके सामाजिक भान असणारी उत्तम क्रियाशील कार्यकर्ती म्हणून शिल्पा खोत यांचा परिचय अनेकांना आहे तो यामुळेच.
प्रकाश तेंडोलकर
संस्थापक अध्यक्ष
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग

सौं. शिल्पा यतीन खोत सामाजिक भान असणारे लोकनेतृत्व!
