वादळी वाऱ्याने चिवला बीच परिसरात माड कोसळला
वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा ठप्प
यतीन खोत व स्थानिक नागरिकांच्या मदतीने वीज वितरणने वीज पुरवठा केला सुरळीत
राहुल जाधव | मालवण : चिवला बीच परिसरात वादळी वाऱ्याने नारळाचे झाड थेट वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला.
दिवाळी सुट्ट्यांमुळे चिवला बीचवर पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही खंडित वीज पुरवठायामुळे समस्यांना सामोरे जावे लागले.
मात्र माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोत यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला आणि स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर वीज वाहिन्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले. त्यांच्या या तत्परतेमुळे अल्पावधीतच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वीज कर्मचारी यांना यश आले. यामुळे पर्यटकांची होणारी गैरसोय आणि स्थानिकांचे संभाव्य नुकसान टळले.

परिसरातील मनोज शिरोडकर, रुपेश कांबळी, गणेश चिंदरकर, मनोज मयेकर, प्रदीप मयेकर, सर्वेश बागवे, राज कांदळकर यांसह इतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.

