आपल्या सुरेख पेंटिंग कलेने शाळेच्या भिंती केल्या बोलक्या.
श्रावण : मालवण तालुक्यातील श्रावण येथील सुप्रसिध्द पेंटर संजय उर्फ भाई अंकुश परब श्रावण यांनी म. गांधी प्रा. शाळा श्रावण नं. १, चित्रे व रंगरंगोटी मोफत करुन, शाळेच्या भिंती सुबक व बोलक्या केल्याबद्दल शाळेचे अध्यक्ष शिवराम परब व श्रावणचे पोष्टमन व शिक्षण प्रेमी उमेश श्रावणकर यांचे हस्ते शाल, श्रीफळ,भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
श्रावण शाळेचे आदर्श शिक्षक, नाट्यनिर्माते चित्रकार कै.अंकुश आत्माराम परब यांचा वारसा पुढे चालवणारे गुरुजींचे सुपुत्र संजय परब हे पेंटीग कामात अतीशय हुशार व तरबेज आहेत. ते अक्षर व चित्रे अतीसुंदर व हुबेहुब काढतात. त्यामुळे भाई परब हे सतत रंग कामात व्यस्त असतात. पेंटर संजय परब हे श्रावण शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने, शाळेला दरवर्षी सहकार्य करत असतात. सरस्वती पुजन व शाळेच्या स्नेहसंमेलन दिवशी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतीक कार्यक्रमांत मुलांना रंगरंगोटी करुन आकर्षक बनवण्याचे काम दरवर्षी मोफत करतात. यावर्षी शाळेला रंग व भिंतीवर चित्रे मोफत काढल्याने शाळा बोलकी व सुबक केली. त्यामुळे शाळेच्यावतीने भाई परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रावण सरपंच सौ. नम्रता मुद्राळे, सौ. योगिता परब, सुप्रिया यादव, सुरेंद्र परब, जगदीश चव्हाण व गावातील सर्व ग्रामस्थ, पालक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

