ड्रोन चा वापर ठरतोय महत्वपूर्ण
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे शोध मोहीम
वेंगुर्ले : शिरोडा समुद्रात बुडून बेपत्ता असलेल्या चार पर्यटकांपैकी श्री. इकवान इमरान कित्तूर, वय 15, रा. लोढा, बेळगाव याचा मृतदेह मोचेमाड समुद्रकिनारी असल्याचा ड्रोन मुळे दिसून आले. पालकमंत्री नितेश राणे हे या घटनेकडे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या सूचनेनुसार आज सकाळपासून समुद्रात ड्रोन द्वारे शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी ड्रोनच्या कॅमेरात हा मृतदेह मोचेमाड मध्ये दिसून आला. याबाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांनी माहिती दिली.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मृतदेह ड्रोन मध्ये दिसून आला. त्यानंतर प्रशासनाच्या व नागरिकांच्या सहाय्याने हा मृतदेह मोचेमाड समुद्र किनाऱ्यावर बाहेर काढण्यात आला. पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांनी रुग्णवाहिकेद्वारे हा मृतदेह रेडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. दरम्यान अजूनही दोन पर्यटक समुद्रामध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा शोध ड्रोन द्वारे घेतला जात आहे.
शिरोडा- वेळागर समुद्रातील घटना
• आज 2 पर्यटकांचे मृतदेह मिळाले
• मृतांची एकुण संख्या- 5
• 2 पर्यटक अद्यापही बेपत्ता
काल दि. 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिरोडा - वेळागर येथील समुद्रात सायंकाळी 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती. या पर्यटकातील 4 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले होते. यातील 3 पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) श्रीमती. इसरा इमरान कित्तूर, वय 17 रा. लोढा, बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते.
तीन मयत पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे
श्रीम. नहिदा फरीन इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत),श्री. इबाद इरफान कित्तूर , वय 13, रा. लोंढा, बेळगाव (मयत), श्रीमती नमीरा अफताब अख्तार, वय 16, रा. अल्लावर, बेळगाव (मयत)
बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध माहिमेत आज 4 ऑक्टोंबर रोजी 2 पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहेत. श्री. इकवान इमरान कित्तूर, वय 15, रा. लोढा, बेळगाव (मयत), श्री. फरहान मोहम्मद मणियार, वय 20 रा. कुडाळ, सिंधुदुर्ग (मयत).
उर्वरित बेपत्ता पर्यटकांची नावे पुढीलप्रमाणे
श्री. इरफान मोहम्मद इसाक, कित्तूर, वय 36, रा. लोंढा, बेळगाव, श्री. जाकीर निसार मणियार,वय 13, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग,
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. शोध व बचाव मोहिमेसाठी कोस्टगार्ड रत्नागिरी यांची मदत देखील घेण्यात येणार आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

