सोने लुटण्याच्या कार्यक्रमास भाविकांची अलोट गर्दी
पाच दिवस भाविकांना होणार बारापाच दैवतांची एकत्र भेट.
मंगेश नलावडे | मालवण : मालवण तालुक्यातील कांदळगाव श्री रामेश्वर देवाचा दसरोत्सव-शिव लग्न सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी कांदळगाव गावी भाविक भक्तांची अलोट गर्दी या सोहळ्यास दिसून आली.
मालवण कांदळगाव येथिल श्री देव रामेश्वर हे स्वयंभू आणि जागृत असे देवस्थान आहे. या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात दसऱ्या दिवशी शिव लग्न सोहळा संपन्न होतो. यावर्षी ही दसऱ्या दिवशी श्री देव रामेश्वर देवा हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त येथील सातेरी देवी मंदिरात नवरात्री निमित्त घटस्थापना केली जाते. नऊ दिवस याठिकाणी जागर करून दसऱ्या दिवशी ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवाचे विधिवत पूजन करून येथील देवताच्या (खांब) तरंगा ना आकर्षक सजविले जाते. दुपारी समस्त ग्रामदेवतेचे बारा पाच मानकरी जमून ढोल ताशाच्या गजरात येथील सातेरी देवालयात जाऊन विधिवत पूजन झाल्यावर येथील असलेले आपट्याच्या झाडाला सोन्याचे झाड मानून सोने लुटण्याचा सोहळा संपन्न झाला.


यावेळी सोने लुटण्यासाठी भाविक भक्तांची एकच झुंबड उडाली होती. असा हा पारंपारिक रीतीरिवाजाप्रमाणे "शिव लग्न सोहळा" मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला. जमलेले भाविक भक्त देवाला सोन अर्पण करून झाल्यावर आपल्या मित्रा मंडळीना आपट्याच पान देऊन गळाभेट घेत जेष्ठ मित्र मंडळींचा आशीर्वाद घेताना दिसत होते. त्यानंतर येथील रवळनाथ मंदिरा समोरील बारा पाच मांडावर भाविक भक्तांच्या समस्यांचे शिव कळे द्वारे निराकरणासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी रामेश्वर देवाचे पाच तरंग यात रामेश्वर, गांगेश्वर, सातेरी, कमरा देवी, रवळनाथ ह्या तरंगा सहित अन्य देवताचा भाविक भक्तांनी आशिर्वाद घेतला. कांदळगाव चा हा दसरोत्सव 5 दिवस चालणार असून यात दुपारी 3 नंतर भाविक भक्तांच्या अडी अडचणीचे निराकरण केले जाणार आहे. भाविक भक्तांनी या सोहळ्यात उपस्थित राहावे असे आवाहन केले जात आहे.



