कलेच्या उपासक
💐 नवदुर्गा : पुष्प पाचवे 💐

सौ. केतकी केदार सावंत
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम..! देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….!
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कला क्षेत्रातही स्त्री शक्तीने आपले विशेष स्थान निर्माण केले आहे.

मालवण तालुक्यातील त्रिंबक सौ. केतकी सावंत यांचे माहेर. माजी उपसभापती अशोक बागवे यांची त्या कन्या. तर कुडाळ तालुक्यातील पोखरण हे सौ. केतकी केदार सावंत यांचे सासर. एक उत्कृष्ट शिक्षक आहेत. या सोबत कीर्तन क्षेत्रातील आपल्या प्रगल्भ वक्तृत्व शैलीने आणि संतांच्या अभंगवाणीचे निरूपण करताना भक्तिभावाने समरस होऊन उपस्थित कीर्तन रासिकाना मंत्रमुग्ध करतात. बालपणा पासून कलेची आवड आणि कला क्षेत्रातच करिअर करण्याची महत्त्वाकांक्षा देवी शारदेच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. आजी व आई पासून मिळालेला संगीताचा वारसा पुढे वैवाहीक जीवनातही सासरे व पतीच्या मार्गदर्शनामुळे चालूच ठेवला.
कीर्तनाचे धडे आदरणीय गुरुवर्य कै. श्रीराम झारापकर यांचेकडून मिळेले. ज्यांच्या नावातच राम आहे असे गुरू मला लाभले माझ्यासाठी अहो भाग्यच असे त्या सांगतात.
वैदिकी काळापासून स्त्रीयांना सर्व क्षेत्रात पुरुषा प्रमाणे मानाचे स्थान होते. यात मैत्रय्यी, गार्गी, अशा अनेक विद्वान स्त्रिया होऊन गेल्या त्या नंतरच्या काळात संत महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणा बाई, सोयरा बाई, यांनी समाज प्रबोधनाचे काम आपल्या साहित्या मधून केले. संतजना बाई आपल्या अभंगात म्हणतात. "स्त्री जन्म म्हणवूनी न व्हावे उदास साधू संत ऐसे केले ज्यांनी" पूर्वी स्त्रियाना समाजात दुय्यम स्थान नव्हते.

आतच्या काळात त्या विद्वान स्त्रियांचा वारसा विविध क्षेत्रात स्त्रिया चालवत आहेत. अग्र क्रमाने पुढे नेत आहेत. त्यातीलच एक नवदुर्गेच्या रूपात गुरुवर्य ह. भ. प. झारापकर गुरुजी यांच्या भागवत भक्त प्रबोधणीच्या माध्यमातून अनेक स्त्री कीर्तनकार घडविले गेले त्यापैकी एक कीर्तनकार सौ. केतकी सावंत होय.
आपली भारतीय संस्कृती, ज्ञानाने समृद्ध आहे. भंग नाही जया म्हणावे तया 'अभंग' असे संत साहित्य आहे. संतांनी लिहून ठेवलेला हा ठेवा जनमाणसांपर्यंत पोहोचले पाहीजे यासाठी "कीर्तन' हे उत्तम साधन आहे. समाजप्रबोधनासाठी कीर्तनच योग्य दिशादर्शक ठरेल असे मला वाटते. कीर्तनकार म्हणजे संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचविणारा जणू देवाने या कलियुगात निर्माण केलेला आपला सेवक आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. प्रपंच करून परमार्थ साधण्यासाठी कीर्तनाची भूमिका महत्त्वाची वाटते.
जे जे आपणासी ठावे। ते इतरांसी सांगावे। शहाणे करून सोडावे । सकळ जन ||

ही समर्थ वाणी कीर्तनातून साध्य होते. शाळा हा समाजाचाच एक घटक आहे. उद्याची भावी पिढी उत्कृष्ठ घडण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. एक शिक्षिका म्हणून तसेच एक नवोदीत कीर्तनकार म्हणून माझा देव, देश आणि धर्मासाठी मी नेहमीच कार्यतत्पर राहून मिळालेल्या संधीचं सोनं करेन. असे ही सौ. केतकी सावंत सांगतात.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो. तिथे
देवतांचा निवास असतो.
नारीशक्ती फार मोठी आहे. जिच्यामुळे हे
जग पाहता येते ती आपली 'माता' आणि
आणि दुसरी 'धरणीमाता' या दोनही मातांना वंदन !
सौ. केतकी केदार सावंत यांच्या पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

