कुंभार समाज बांधवांनी सहभागी होण्याचे दिलीप सांगावेकर यांचे आवाहन
मालवण : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाच्या वतीने २३ व २४ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील जिजामाता चौक येथे लाक्षणिक उपोषण व इशारा आंदोलन छेडण्यात येत आहे. या आंदोलनात कुंभार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सांगवेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप चर्चेत आहे. केवळ ओबीसीच नव्हे तर इतर आरक्षित समाजातील लोकही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. भारतीय संविधानाने दिलेला शैक्षणिक, सामाजिक, शासकीय आणि राजकीय आरक्षणाचा हक्क वाचवण्यासाठी, जिल्हा-जिल्ह्यातून ओबीसी समाजाचे लोक आपली नाराजी व्यक्त करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आरक्षणाचा हक्क पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अनेक संघटना करत आहेत. त्यामुळे वेळीच एकत्र येऊन या प्रयत्नांना विरोध करणे आवश्यक आहे, असे या संघटनांचे मत आहे. अन्यथा संपूर्ण बहुजन समाजासमोर मोठे संकट उभे राहू शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी असे एकूण ५२ टक्के पेक्षा जास्त आरक्षित समाज आहे. या सर्व समाजांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याची जाणीव महाराष्ट्र सरकारला करून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने हे आंदोलन जाहीर केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांनी सहभागी होऊन आपल्या आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सांगवेकर यांनी केले आहे.

