प्रतिभासंपन्न पखवाज वादक
💐 नवदुर्गा : पुष्प पहिले 💐

कलारत्न | कु. भाविका लक्ष्मण खानोलकर
🖋️ स्काय न्युज टुडे | मंगेश नलावडे : प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम…. देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे' वेब टीमच्या माध्यमातून 'नवदुर्गा' या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….
आज असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत. कोकणची कला दशावतार आणि भजन क्षेत्रात पखवाज वादनाच्या माध्यमातून खानोली गावची सुकन्या कु. भाविका लक्ष्मण खानोलकर यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.या क्षेत्रात स्त्री शक्तीचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा..!
कोकणची संस्कृती असलेल्या दशावतार कलेकडे दिवसेंदिवस युवा वर्गाचा वाढता कल दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी महिलानीही यात पाऊल टाकत आपली कला सादर केली होती परंतु त्यांना संगीत साथ मात्र पुरुषांची होती. मात्र चित्र बदलत आहे स्त्री शक्ती ही यात पुढे येत आहे. खानोली येथील भाविका लक्ष्मण खानोलकर या महाविद्यालयीन विद्यार्थिनी दशावतारी नाटकात दर्जेदार पखवाज वादन करत असून दशावताराच्या इतिहासात भाविकाही पहिली स्त्री पखवाज वादक ठरली असल्याचे बोलले जात आहे. भविका ही सिद्धेश्वर प्रासादीक महिला भजन मंडळ खानोली, वेंगुर्ला बुवा आकांशा खानोलकर, यांना त्या भजन मध्ये पखवाज साथ करतात.

भजनातून पखवाज वादन करताना सर्वप्रथम ती लोकांसमोर आली. तिचे आजोबा काका मठकर व काका घनश्याम खानोलकर हे दशावतारात पखवाज वादन करायचे. भाविकांचे वडील लक्ष्मण खानोलकर यांचीही इच्छा होती की आपली मुलगी हा वारसा छंद म्हणून जोपासावा. अखेर त्यांची ती इच्छा दाभोली येथील गौतमेश्वर दशावतार नाट्य मंडळातून पूर्ण झाली. खानोली येथे ३ डिसेंबरला झालेल्या गौतमेश्वर मंडळाच्या दशावतारी नाटकात भाविका हिने पखवाज वादन करत उपस्थितांची मने जिंकली. भजनातून पखवाज वादन करता करता दशावतारात पखवाज वादन केले.
दशावतारात वाजवले जाणाऱ्या पखवाजाबद्दल भाविकाला आकर्षण निर्माण झाले. आपणही असेच पखवाज वादन करावे असे तिला वाटू लागले यासाठी युट्युब वर उपलब्ध असलेल्या दशावतारी नाटकांच्या विविध व्हिडिओच्या माध्यमातून तिने वादनाचा बारकाईने अभ्यास केला सराव केला. गौतमेश्वर नाट्य मंडळाचे हार्मोनियम वादक प्रल्हाद हळदणकर यांनी तिला दशावतारी पखवाज वादनाचे संपूर्ण ज्ञान दिले त्यामुळे तिचा आत्मविश्वास आणखीनच प्रबळ बनला आणि प्रारंभिक सहज अगदी न घाबरता तिने उत्कृष्ट पखवाज वादन केले.
भाविकांचे महाविद्यालयीन शिक्षण बी कॉम पर्यंत झाले आहे. पखवाज वादन क्षेत्रात तिने प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण केली असून आता पखवाज विशारद होण्याच्या अभ्यास अलंकार शिकत आहे.

भाविकांने पखवाज वादन हे एक वेगळ कला क्षेत्र निवडल. मुली या क्षेत्रात कमीच दिसून येतात कारण पखवाज हे वाद्य शिकण्यासाठी ताकद मेहनत आणि सराव महत्वाचा आहे. जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळवं असं भाविकाला वाटत. एवढी गुणवत्ता असूनही भाविका ही नम्र स्वभावची आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात भाविका स्वतः हुन प्रसिद्धी मिळण्यासाठी चार हात दूरच असते. आपले व्हिडीओ लोकच शूट करून अपलोड करतात आपलं काम पखवाज वादन ते आपण करत राहणार असे नम्रपणे भाविका सांगते.
दशावतारात पखवाज वादन करताना सिंधुदुर्ग जिल्हासह गोवा राज्यात ही मंडळाचे कार्यक्रम होतात. रसिक जी मला दाद देतात त्यामुळे आपण भारावून गेलो आहोत. नाटकातील पखवाज वादन हा आपला छंद म्हणून जोपासणार असल्याचे भाविका सांगते.

भाविका ही निलेश पेडणेकर यांच्याकडे पखवाज वादनाचे शास्त्रीय धडे घेत असून यापूर्वी ती पखवाज वादनाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे. एक स्त्री कलाकार पखवाज वादन करताना आणि समाजात मिळणाऱ्या मानसन्मानाने आपल्याला अधिकच बळकटी मिळत आहे. युवा तरुणाई ने देखील विविध क्षेत्रात शास्त्रोक्त अभ्यास पूर्ण शिक्षण घेण्याकडे आपली तयारी ठेवली पाहिजे. शिक्षण घेताना लक्ष केंद्रित करून धैर्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. नियमित रियाज करून आपली कला उत्कृष्ट कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. असे यावेळी भाविका सांगते.
भाविकांच्या या कर्तुत्वाला आणि पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!
▪️अमित खोत | मालवण, सिंधुदुर्ग

