भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव - श्री हरी चव्हाण
असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांचा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मालवणात रॅलीच्या माध्यमातून एल्गार
मालवण | : देशाच्या प्रगतीत सर्वच क्षेत्रातील महिलांचे फार मोठे योगदान आहे. त्यात असंघटित क्षेत्रातील महीलाही मागे नाहीत. मात्र आज असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगार, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला, मच्छी विक्री, भाजी विक्री व मोलमजुरी करणाऱ्या महिला कामगार उपेक्षितच आहेत. या महिला कामगारांचे समाजातील स्थान बळकट होणे गरजेचे असून, या साठी शासनाने शास्वत योजनांच्या माध्यमातून असंघटित महीला कामगारांना सामाजिक सुरक्षितता द्यावी. अशी मागणी भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव श्री हरी चव्हाण यांनी केली.
संपूर्ण देशभरात १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंतीनिमित्त भारतीय मजदूर संघाच्या वतीने कामगार दिन पाळला जात आहे आणि कामगारांच्या प्रश्नांची शासनाला जाणीव करून देण्यात येत आहे यासाठी आज मालवण शहरात असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांच्या प्रश्नांसाठी जनजागृती रॅलीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या रॅलीमध्ये भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, कोकण विभाग संघटनमंत्री भगवान साटम, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव, घरेलू कामगार जिल्हाध्यक्षा प्राची परब, घरेलू कामगार जिल्हा सदस्य भाग्यश्री माळकर, कल्पिता जोशी व अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते या रॅलीमध्ये मालवण तालुक्यातील घरेलू कामगार, स्वयंरोजगार करणाऱ्या महिला, भाजी विक्री व मच्छी विक्री करणाऱ्या तसेच मोलमजुरी करणाऱ्या महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आज केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व स्तरातील कामगारांना न्याय देण्याच्या उद्देशाने काम केले जात असताना व योजना तयार केल्या जात असताना, असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगार व अन्य असंघटित महीला कामगारांना उपेक्षित ठेवण्यात आले आहे. घरेलु कामगारांसाठी काही योजनांचे शासन आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही ही शोकांतिका आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सर्व स्तरातील कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असताना, असंघटित क्षेत्रातील घरेलू कामगारांचे स्थान हे बळकट होणे गरजेचे आहे. त्यांचे व कुटुंबियांचे आरोग्य निरोगी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर असंघटित क्षेत्रातील सर्व महीला कामगारांना विमा संरक्षण, वय वर्ष ६० नंतर पेन्शन योजना, मुलांना शैक्षणिक आर्थिक लाभ व अन्य शास्वत योजनांच्या माध्यमातून या असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांचे बळकटीकरण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारने असंघटित महीला कामगारांना न्याय देण्यासाठी असलेल्या मंडळांचे पुनर्गठन करावे.व आर्थिक बळकटीकरण होण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी.अन्यथा असंघटित क्षेत्रातील महिला कामगार रस्त्यावर उतरून आक्रोश करणे भाग पडले.

