लोकांच्या विस्मरणात जाऊ नये यासाठी सतत काहीतरी विचित्र विधाने हेच नाईकांचे काम
काचेच्या घरात राहणाऱ्या वैभव नाईक यांनी केवळ प्रसिद्धीसाठी फुकटचे गावभर दगडफेक करत फिरू नये
शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांची टिका
सिंधुदुर्ग | : गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निलेशजी राणे ही नवी युवा पिढी खुल्या दिलाने एकत्र येत असेल तर त्यात लोकनिवृत्त आमदार वैभव नाईक यांच्या पोटात दुखण्याचे कारणच काय? आमचे वैरही टोकाचे होते आणि यापुढे प्रेमही तसेच असेल हे आमदार निलेशजी राणे यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे. मग एक चांगली सकारात्मक सुरुवात होत असताना वैभव नाईक यांचा सोळा वर्षांपूर्वीचे राणे-कदम वैर उगाळण्याचा नतद्रष्टपणा कशाला? वैभव नाईक यांना कुठे काहीच चांगले होत असलेले बघवत होत नाही का? असा रोखठोक सवाल शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांनी उपस्थित केला आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रात किसन मांजरेकर म्हणाले, आमदार निलेश राणे ज्या संयमाने शांतपणे, पण वादळी गतीने कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात काम उभे करत आहेत त्याची धास्ती लोकनिवृत्त आमदार वैभव नाईक यांनी घेतली आहे. लोकांच्या विस्मरणात जाऊ नये यासाठी सतत काहीतरी विचित्र विधाने करून ते विरोधाभास निर्माण करू पाहत आहेत आणि त्यातून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. ज्यांच्या अख्या खानदानाची हयात काँग्रेसमध्ये गेली आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करण्यात गेली ते वैभव नाईक अचानक कुठल्या स्वार्थासाठी त्यावेळी शिवसेनेचे निष्ठेचे पाईक म्हणून मिरवू लागले याचेही उत्तर त्यांनी द्यायला हवे. काचेच्या घरात राहणाऱ्या वैभव नाईक यांनी केवळ प्रसिद्धीसाठी फुकटचे गावभर दगडफेक करत फिरू नये हेच त्यांच्या हिताचे राहिल. असाही टोला किसन मांजरेकर यांनी लगावला.

