युथ फेस्टिवल २०२५ ची सुवर्ण पदक विजेती महिला पखवाज वादक
सिंधुदुर्गच्या शिरपेचात खोवला सोनेरी सन्मानाचा तुरा
कुडाळ : कुडाळ आंदुर्ले गावची पखवाज विशारद कु.श्रृतिका श्रीकृष्ण मोर्ये हिने युथ फेस्टिवल २०२५ चे सुवर्ण पदक मिळविले. तिच्या या कर्तबगिरीमुळे सिंधुदुर्ग, कुडाळच्या शिरपेचात सोनेरी सन्मानाचा तुरा खोवला आहे. युथ फेस्टिवल २०२५ सुवर्ण पदक विजेती श्रुतिका मोर्ये हिचे सर्व स्तरतून कौतुक होत आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या ५८ व्या इन्टरल कॉलेज कल्चरल युथ फेस्टिवल मध्ये, क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल सोलो, तालवाद्य प्रकारामध्ये पखवाज सोलो वादना मध्ये श्रुतिका मोर्ये हिने यश मिळविले. राज्य भरातील कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत अव्वल दर्जाचे ३६ स्पर्धक सहभागी झाले होते. विविध ताल वाद्य प्रकारातील पखवाज एकल वादन सादरीकरणा मध्ये कु. श्रृतिका मोर्ये हिने अव्वल क्रमांक पटकावून, मुंबई युनिव्हर्सिटीतच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, कुडाळ तालुक्यात, संत राऊळ महाराज महाविद्यालयात आपल्या या यशस्वीततेची नोंद सुवर्णाक्षरां मध्ये नोंदवली आहे.
पखवाज एकल वादना मध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिलीच विद्यार्थीनी (महिला) ठरली आहे. पखवाज विशारद कु श्रुतिका मोर्ये हिच्या या सुवर्ण यशामुळे, संत राऊळ महाराज महाविद्यालय, तसेच प. पू. नामदेव महाराज संगीत विद्यालयाची मान सन्मानाने उंचावली आहे.
या तिच्या अभुतपूर्व यशामागे तिला मार्गदर्शन करणारे व तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे तिचे आई-वडील, संत राऊळ महाराज महाविद्यालयातील शिक्षक वर्ग व प. पू नामदेव महाराज संगीत विद्यालयाचे संचालक गुरुवर्य आनंद मोर्ये गुरुजी या सर्वांचे सुयोग्य मार्गदर्शन मिळाले. श्रुतिका मोर्ये हिला मिळालेल्या या सुवर्ण यशामुळे तिच्या गावाचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव सुवर्ण नोंदणीकृत ठरले आहे. तिला मिळालेलं हे यश निश्चितच जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक व दिशादर्शक ठरेल. पखवाज विशारद श्रुतिका मोर्ये हिने मेहनत, चिकाटी, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळवलेल्या या यशा बद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

