वार्षिक रक्षण रखवालीचे मानाचे श्रीफळ देणार मानकऱ्यांच्या हाती..!
महान गावी फुलणार भावीक -भक्तांचा मळा ..!
मालवण | : कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांची वार्षिक पारंपारिक भेट सोहळा १८ सप्टेंबर रोजी महान गावी संपन्न होणार आहे. यावेळी रयतेच्या रक्षण रखवाली साठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे राखणीचे श्रीफळ राणे-परब बारापाच मानकरी यांच्या जवळ देण्यात येणार आहे.या दोन्ही देवतेच्या भेट सोहळ्या दरम्यान भाविक भक्तांची महान गावी अलोट गर्दी होणार आहे.
गुरुवारी सकाळी कांदळगाव श्री देव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब मानकरी श्री रामेश्वर देवालयात जमून गाऱ्हाणे करून झाल्यावर कांदळगाव माळराना वरुन जुन्या पारंपरिक वाटेने ढोल, तशा, अशा सवाद्य रायत लवाजम्या समवेत चालत महान या गावी येणार आहेत. १८ रोजी सकाळी महान गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर देवाची विधिवत पूजा, अभिषेक, रक्षण राखावालीच्या श्रीफाळाचे पूजन महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
त्यानंतर गांगेश्वर देवाला कौल प्रसाद लावून रक्षण राखवली चे श्रीफळ परब मानकरी यांच्या जवळ देण्यात येणार आहे. श्रीफळ घेऊन समस्त राणे- परब बारापाच मानकरी सहवाद्य माळराना वरून कांदळगाव येथे येणार आहेत.नवरात्री उत्सवात येथील श्री सातेरी देवी मंदिरात हे राखवली चे श्रीफळ ठेवण्यात येणार आहे. नऊ दिवस याठिकाणी भजन,पूजन,जागर होणार आहे. दसरा उत्सवा दिवशी हे रखवालीचे श्रीफळ बारापाच मांडावर आणण्यात येणार आहे.यावेळी कांदळगाव रामेश्वर देवस्थानचे राणे-परब बारापाच मानकरी व महान श्री देव गांगेश्वर देवस्थानचे बारापाच मानकरी उपस्थित राहणार आहेत. भक्तांच्या अलोट गर्दीत हा भाव भक्तीचा सोहळा संपन्न होणार आहे.

