बिल्डिंग खालील पार्किंगच्या जागेत ब्लॅंकेटच्या साहाय्याने गळफास घेत केली आत्महत्या
मालवण | प्रतिनिधी : मालवण रेवतळे येथील रहिवासी संदीप मनोहर पाटकर (वय ५०) यांनी शनिवारी दि. ६ रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या बिल्डिंगच्या खालील पार्किंगच्या जागेत ब्लॅंकेटच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार संदीप पाटकर हे शनिवारी दुपारी रेवतळे येथील कॉम्पलेक्समध्ये आपल्या घरी आल्यावर कॉम्पलेक्सच्या बिल्डिंगच्या खाली वाहन पार्किंगच्या जागेतील स्लॅब ला असलेल्या लोखंडी हुकाला ब्लॅंकेट बांधून त्याद्वारे गळफास घेतला. याचवेळी तेथून जात असलेल्या शेजारील एका युवकाने त्यांना लटकताना पाहिले असता त्याने त्याठिकाणी धाव घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतानाच आरडाओरड करत घरी असलेल्या त्यांच्या पत्नीला बोलावून घेतले. यावेळी यां दोघांनीही गळफास काढत संदीप यांना खोलीवर नेल्यानंतर तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होत संदीप यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मालवण पोलिसांना याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी दाखल होत पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
याबाबत त्यांच्या मुलाने मालवण पोलिसात खबर दिली असून आकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. संदीप पाटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व मुलगा तसेच दोन बहिणी असा परिवार आहे.

