संशयीत आरोपींतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले
मालवण : देवली येथे अवैध वाळूची विनापरवाना वाहतुक करताना पकडलेले अटक संशयीत डंपर चालक प्रथमेश बाळकृष्ण गावडे वय 25 वर्ष रा. माड्याचीवाडी कुडाळ, गौरव अरूण नाईक वय 30 वर्ष रा. रांगणा-तुळसुली, कुडाळ, शेखर शंकर राठोड वय ४२वर्ष रा. गुढीपूर पिंगुळी कुडाळ आणि शंकर सुरेश भितये वय 30 वर्ष रा. गोठोस कुडाळ पिंगुळी यांना मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब वेंगुर्ला यांनी प्रत्येकी रक्कम रु. ५०,००० /- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयीतांतर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.
मे. मंडळ अधिकारी मालवण हे नायब तहसीलदार व अन्य महसूल कर्मचारी यांचेसमवेत दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी अवैध गौणखनिज वाहतुकीची तपासणी करण्याकरता देवली येथे गेले असता सायंकाळी 5 वाजता देवली बोवलेकरवाडी येथे प्रथमेश बाळकृष्ण गावडे, गौरव अरूण नाईक, शेखर शंकर राठोड आणि शंकर सुरेश भितये हे संशयीत त्यांचे ताब्यातील डंपर मधून वाळू वाहतुक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर थांबण्यास सांगितले असता डंपर चालक पुढे निघून गेले. त्यामधील २ डंपर चालकांनी वाळु ओतून डंपर रिकामे कले. अन्य दोन डंपर मधेही वाळू आढळून आली नाही. त्यामुळे महसूल अधिका-यांनी डंपर व ओतलेली वाळू ताब्यात घेऊन संबंधित डंपर चालकांविरूद्ध मालवण पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार नोंद केली. त्यानंतर मालवण पोलिसांनी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय्य संहिता कलम ३०३ ( २ ), ३ ( ५ ) अन्वये गुन्हा नोंद केला. त्यानुसार केलेल्या पोलिस कारवाईत संशयीत डंपर चालकांना पोलिसांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करून ताब्यात घेतले होते.
प्राथमिक तपासकाम व गुन्ह्यामधील वाहने व वाळू रितसर जप्त करून सर्व अटक संशयीतांना पोलिसांनी मालवण न्यायालयाचा पदभार असलेल्या मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वेंगुर्ला यांचे न्यायालयात त्याच दिवशी हजर करण्यात आले. अधिक तपासाकरिता मालवण पोलिसानी सर्व संशयितांची २ दिवसांच्या पोलिस कस्टडीची मागणी केली होती. मात्र आवश्यक रिकव्हरी पूर्ण झाली असल्याने व प्राथमिक तपासकाम पूर्ण झाले असल्याच्या कारणास्तव मे. न्यायालयाने पोलिसांची पोलीस कस्टडीची मागणी फेटाळून संशयीताना न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर संशयीतांतर्फे केलेल्या जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयितांना प्रत्येकी रक्कम रु. ५०,००० /- चा सशर्त जामीन मंजूर केला.

