शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बक्षीस योजना
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणने अदानी कंपनीचे स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सुरू केलेल्या मोहिमेमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजप आणि महायुतीचे नेते हे मीटर अचूक बिल देतील असा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात वीज बिलांमध्ये तिप्पट ते चौपट वाढ झाल्याने सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकांच्या परवानगी शिवाय जबरदस्तीने हे मीटर बसविले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या जनतेने ठिकठिकाणी महावितरण कार्यालयांवर आंदोलने सुरू केली आहेत, परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार या विषयावर मौन बाळगून असल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे असे उदगार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धिपत्राद्वारे व्येक्त केली आहे.
या गंभीर परिस्थितीचा निषेध म्हणून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने एक अभिनव आंदोलन सुरू केले आहे. कुडाळ-मालवणचे माजी आमदार श्री. वैभव नाईक यांनी अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रुपये बक्षीस मिळवा" अशी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, ज्या ग्राहकाचे बिल स्मार्ट मीटरमुळे कमी झाले असेल, त्याने त्याचा पुरावा सादर केल्यास त्याला १० हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल.
माजी आमदार वैभव नाईक यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की,सत्ताधारी पक्ष आणि महावितरणकडून अदानी स्मार्ट मीटरमुळे बिल कमी येईल असे दावे केले जात आहेत. जर हे दावे खरे असतील, तर एखाद्या तरी नागरिकाचे बिल कमी झालेले दाखवा. आम्ही त्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस देऊ. या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदारांना वेळ देण्याची विनंती करणार आहोत. त्यांच्याच हस्ते हे बक्षीस दिले जाईल, जेणेकरून जनतेला वस्तुस्थिती कळेल.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर वाढीव बिलांचे फोटो शेअर करून आपली व्यथा मांडली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कर्मचाऱ्यांना विरोध केला असून, काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाढीव बिलांमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर ही वाढीव बिलांची भर पडल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या भूमिकेमुळे जनता आश्चर्यचकित झाली आहे. जनतेच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधींकडून या गंभीर प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. श्री. वैभव नाईक यांनी याच मुद्द्यावर बोट ठेवत, पालकमंत्री आणि आमदारांना या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान दिले आहे.
शिवसेनेच्या या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनीही या योजनेचे स्वागत केले आहे. ही योजना केवळ निषेध नसून, सत्ताधाऱ्यांनी केलेल्या दाव्यांची पोलखोल करण्यासाठी एक प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
माजी आमदार नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "हे आंदोलन केवळ राजकीय नाही, तर जनतेच्या हक्कासाठी आहे. जनतेची परवानगी नसताना त्यांच्यावर हे मीटर लादले जात आहेत आणि त्यानंतर भरमसाठ बिलांचा भुर्दंड त्यांच्यावर पडत आहे. जर सत्ताधारी जनतेच्या बाजूने उभे राहिले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू.
या घटनेमुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकारण या स्मार्ट मीटर आणि वाढीव बिलांच्या मुद्द्याभोवती फिरण्याची शक्यता आहे. भाजप आणि महायुतीचे नेते यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र, सध्या तरी 'अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रुपये बक्षीस मिळवा' ही योजना जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेच्या माध्यमातून जनतेच्या मनातील संतापाला वाचा फुटली असून, हा प्रश्न आता केवळ वीज बिलापुरता मर्यादित न राहता राजकीय स्वरूप धारण करत आहे.

