कुडाळ मध्ये प्रशासनाचे लक्ष
जुबेर खान । कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवस जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. मंगळवार १९ ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ तालुक्यातून वाहणाऱ्या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्या मुळे जन जीवनावर परिणाम झाला. या घटने नंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) टीम कुडाळ मध्ये दाखल झाली आणि त्यांनी पूरग्रस्त भागातून ३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाच्या सतर्कते मुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सविस्तर वृत्त असे की, गेल्या काही दिवसां पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.अखेरीस, नदीने धोक्याची पातळी गाठली आणि नदी काठच्या लोकवस्ती मध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. कुडाळ मधील डॉ.आंबेडकर नगर, पावशी, आणि स्टेशन रोड जवळील काही घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे रहिवाशां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पावले उचलली. रात्री १० वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफची टीम कुडाळमध्ये दाखल झाली. त्यांनी बचावकार्य सुरू केले.आणि पाण्याचा वेढा पडलेल्या सुमारे १० घरांतून ३६ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. यात लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश होता. स्थानिक प्रशासनाने आणि एनडीआरएफच्या जवानांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे हे बचावकार्य यशस्वी झाले.

यावेळी कुडाळ तालुक्याचे तहसीलदार विरसिंग वसावे आणि नायब तहसीलदार घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून मदत कार्याला योग्य दिशा दिली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे मोठे संकट टळले आणि नागरिकांना धीर मिळाला.
सध्या कर्ली नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, पूरस्थिती काहीशी निवळली आहे. तरीही, पुढील धोका लक्षात घेता एनडीआरएफची टीम अलर्ट मोडवर आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा प्रशासनही पूर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. हवामान विभागाच्या अंदाजा नुसार आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासन कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या घटनेने पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाची तयारी आणि बचाव दलाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नागरिकांनीही अशा परिस्थितीत घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

