हर्षदा पेंडूरकर उपविजेत्या; दीपा पवार तृतीय; स्पर्धकांवर लाखोंच्या बक्षीसांचा वर्षाव
रेकॉर्ड ब्रेक गर्दीत महिला राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धा उत्साहात संपन्न
सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ यांच्या भव्यदिव्य आयोजनाचे सर्व स्तरातून कौतुक

मालवण : नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या राज्यस्तरीय नारळ लढविणे स्पर्धेत लतिका लुडबे यांनी विजेतेपद पटकावले. त्यांना सोन्या-चांदीने मढवलेला मानाचा श्रीफळ चषक देऊन गौरविण्यात आले. हर्षदा पेंडूरकर यांनी उपविजेतेपद पटकावले, तर दीपा पवार तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. स्पर्धेचे हे 11 वे वर्ष होते.
स्पर्धेला स्वराज्य संघटना, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, कोकण वाईल्ड रेस्क्यूअर सिंधुदुर्ग आणि सेवते प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी आमदार राणे यांचा शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मंदार केणी, भाई कासवकर, महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर, बबन शिंदे, विश्वास गावकर, किसन मांजरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार निलेश राणे यांनी या स्पर्धेचे कौतुक करताना, शिल्पा खोत मित्रमंडळाने आयोजित केलेली ही स्पर्धा सर्वात जुनी आणि सर्वाधिक गर्दी जमवणारी स्पर्धा असल्याचे सांगत कौतुक केले. तसेच, हिंदूंचे सण अशाच प्रकारे मोठ्या थाटात साजरे झाले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या लतिका लुडबे यांना भाजपचे अशोक सावंत, भाई परुळेकर, मंदार केणी, भाई कासवकर, शिल्पा खोत आणि यतीन खोत यांच्या हस्ते सोन्या-चांदीने मढवलेला श्रीफळ चषक, सोन्याची नथ, सोन्याचे नाणे आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या हर्षदा पेंडूरकर यांना महानंदा खानोलकर, शर्वरी पाटकर, तारका चव्हाण, नमिता गावकर आणि सौ. प्रभाळे यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी देऊन गौरविण्यात आले.

तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या दीपा पवार यांना करुणा जळवी आणि समस्त स्वराज्य, यशराज प्रेरणा, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, तसेच शिल्पा यतीन खोत यांच्या हस्ते सोन्याची नथ आणि पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ म्हणून निवड झालेल्या मौसमी जाधव यांना चांदीच्या भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमात लहान मुलांसाठीही नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशांत हरिश्चंद्र पेंडूरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. स्वरा वसंत कांदळगावकर द्वितीय आणि रोहन संतोष गोवेकर तृतीय क्रमांकावर राहिले. या तिन्ही विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.


यावेळी शिल्पा खोत मित्रमंडळातर्फे विविध क्षेत्रांत उत्कृष्ट काम करणाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये पारंपरिक वादक लक्ष्मण मालवणकर, बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाते पंकज गावडे, ब्लड बँक सिंधुदुर्गचे रक्तपेढी तंत्रज्ञ श्रीपाद ओगले, मालवणचे नंदकुमार आडकर, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्गचे ओमकार लाड, डॉ. प्रसाद धमक, श्री. चिऊळकर, सिद्धेश ठाकूर, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, दर्शन वेंगुर्लेकर आणि व्यावसायिक अनिता आळवे यांचा समावेश होता.

स्पर्धेदरम्यान स्वराज्य ढोल ताशा पथकाने 'महाकाल' या संकल्पनेवर आधारित ढोल वादनाचे सादरीकरण केले. स्वराज्य ढोल पथक सादरीकरणने आसमंत दाणानून गेला. पुणे नाशिक येथेही असे ढोल पथक नसेल असे सांगत आमदार निलेश राणे तसेच मान्यवरानी ढोल पथकाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी बुलंद आवाज बादल चौधरी आणि अक्षय सातार्डेकर यांनी खास शैलीत करून स्पर्धेची रंगत अधिक वाढवली.

