जुबेर खान । मालवण : मालवण-कसाल मुख्य मार्गावर असलेल्या कुणकावळे कुपेरी येथील घाटीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन मोठे गवेरेडे अचानक रस्त्यावर आल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. या अनपेक्षित दर्शनामुळे अनेक वाहनचालक गोंधळून गेले आणि घाबरून त्यांनी आपली वाहने थांबवली. रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या या गव्यांच्या दर्शनाने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
प्रत्यक्षदर्शी वाहनचालकांनी गव्यांचे फोटो काढून इतरांना तसेच गावातील लोकांना ही माहिती दिली. त्यानंतर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कुणकावळे गावाच्या वस्तीजवळच हे गवेरेडे दिसल्याने गावातील रहिवाशांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी केली आहे.
ही घटना घडली तेव्हा एकाच वेळी अनेक वाहने या मार्गावरून येत होती. अचानक समोर आलेले भलेमोठे गवेरेडे पाहून वाहनचालकांना आपली वाहने थांबवावी लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
वनविभाग विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा कोणताही धोका निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गव्यांचा वावर हा मानवी वस्तीजवळ वाढल्यास शेतीचे नुकसान आणि मानवी सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वनविभागाने या गव्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

