भव्यदिव्य स्वरूपात होणार सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन व सांस्कृतीक मेळा
महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी सोहळा ठरणार रंगतदार
अमित खोत | मालवण : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण होत असून हा हिरकमहोत्सव सोहळा २६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यनिमित्ताने कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे स्नेहसंमेलन व भव्यदिव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. हजारो माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून कायम स्मरणात राहिला असा सोहळा संपन्न करूया. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या हिरकमहोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी विध्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, गौरव ओरसकर, नितीन वाळके व सहकारी यांनी पत्रकार परिषदेत केले.
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे मालवण येथील कान्हा रसोई हॉटेल मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुधीर धुरी, नितीन वाळके, गौरव ओरसकर, महेश काळसेकर, नंदकिशोर महाजन, दीपक कुडाळकर, प्रदीप नाईकसाटम, अभय कदम, हेमचंद्र कोयंडे, रुपेश खोबरेकर, प्रफुल्ल देसाई, शुभांगी सुकी, गौरी मयेकर, मनोज मयेकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी हिरकमहोत्सवी कार्यक्रमासाठी आवश्यक निधी संकलनासाठी क्यूआर कोडचे अनावरण करण्यात आले.
यावेळी सुधीर धुरी यांनी हिरकमहोत्सव कार्यक्रमाबाबत माहिती दिली. हिरक महोत्सवासाठी १९६५ ते २०२४ पर्यंतच्या सर्व बॅचच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हाट्सअप गुपद्वारे माजी विद्यार्थ्यांना जोडले जात आहे, तसेच गुगल फॉर्म द्वारे माजी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. निधी संकलनासाठी क्यूआर कोड आम्ही जाहीर करत असून प्रत्येकी किमान १००० रु. रक्कम ठरविण्यात आली आहे. त्यापेक्षाही जास्त रक्कम स्वीकारली जाईल. माजी विद्यार्थ्यांनी महोत्सवासाठी सहकार्य करतानाच मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सुधीर धुरी यांनी केले.
यावेळी गौरव ओरसकर यांनी कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली. २६ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत स. का. पाटील महाविद्यालयात संस्थेच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमास सर्व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे तसेच स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ३ ते रात्री उशिरापर्यंत मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे. हा कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी आम्ही माजी विद्यार्थी संघटना, नियोजन समिती यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी जो निधी गोळा करणार आहेत तो निधी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न राहील, तसेच त्यातील जास्तीत जास्त निधी कॉलेजच्या हितासाठी वापरण्यात येणार असल्याचे ओरसकर यांनी स्पष्ट केले.
नितीन वाळके म्हणाले, माजी विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात जी मजा मस्ती केली, तीच मजा मस्ती धम्माल करण्यासाठी हे स्नेहसंमेलन असणार आहे. या कार्यक्रमासाठी नाट्यगृह हाऊसफुल होणार यामध्ये कोणतीही शंका नाही. या कार्यक्रमाला पाच वर्षाचा एक गट असे गट बनवून त्यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे कामानिमित शिक्षणानिमित जे जे माजी विद्यार्थी मालवण सोडून बाहेर असतील त्यांनी आताच २६ तारीखच्या कार्यक्रमाला येण्यासाठी तिकिटे बुक करावीत. या हिरकमहोत्सवासाठी कॉलेजच्या माजी प्राध्यापकाना, प्राचार्य यांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यास अधिक आनंद होईल, जे येऊ शकणार नाहीत त्यांच्या शुभेच्छा रुपी व्हिडीओ क्लिप मागवू, त्यांना पुन्हा एकदा भेटणे ही मोठी भावनिक गुंतवणूक आहे, असेही नितीन वाळके म्हणाले.
फोटो : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे हिरकमहोत्सवी कार्यक्रमाच्या निधी संकलनाच्या क्यूआर कोडचे अनावरण केले. (अमित खोत, मालवण)

मंतरलेले दिवस पुन्हा अवतरणार!
