सावंतवाडी : विद्यार्थ्यांना त्यांच्या गावात आणि शाळेतच विविध प्रकारचे दाखले उपलब्ध व्हावेत, यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व शाळा आणि ग्राम महसूल कार्यालयात दाखल्यांची शाळा' हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी हा उपक्रम जाहीर केला आहे.
शाळा, महाविद्यालयीन प्रवेश, शिष्यवृत्ती आणि सरकारी नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या विविध दाखल्यांची विद्यार्थ्यांना आवश्यकता असते. प्रवेश किंवा शिष्यवृत्तीसाठी दाखल्यांची मागणी झाल्यावर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. विद्यार्थी आणि पालकांना एकाच ठिकाणी सर्व दाखले उपलब्ध करून देणे, मध्यस्थांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबविणे, श्रम आणि पैसा वाचविणे, लोकाभिमुख प्रशासन राबविणे, असा या मोहिमेमागचा उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील उत्पन्न अहवाल आणि जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आणि उत्पन्न प्रमाणपत्र यांसारख्या दाखल्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गावातच दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे. व्हॉट्सअॅपद्वारे डिजिटल स्वाक्षरी केलेले दाखले उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आणि जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग आणि उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी, माडखोल, आजगाव, बांदा, मडुरा आंबोली, निरवडे, इन्सुली महसूल मंडळातील गावांमध्ये १ ते ४ एप्रिल या कालावधीत शिबिरे आयोजित करून दाखले देण्यात येणार आहेत. यासाठी मंडळातील ग्रामपंचायत, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व महा ई- सेवा केंद्र चालक, विद्यार्थी आणि पालकांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.

