सिंधुदुर्ग : महावितरणच्या कोकण परिमंडल, रत्नागिरीअंतर्गत महावितरणला ३१ मार्च अखेर २३ कोटी ७० लाख वसूल करायचे आहेत. त्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली असून वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. ३१ मार्च अखेर सर्व सुट्टींच्या दिवशीही वीज बिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू तसेच थकीत वीज बिल भरावे, आणि आपली गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
चालू आर्थिक वर्षाचे काही दिवस शिल्लक आहेत. कोकण परिमंडल, रत्नागिरीअंतर्गत प्रत्येक दिवसाला २ कोटी ६३ लाख वसूल करायचे आहेत.
थकित वीज बिलांच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांबरोबरच मुख्य अभियंता अनिल डोये यांच्यासह रत्नागिरी मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता वैभवकुमार पाथोडे, सिंधुदुर्ग मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अशोक साळुंखे यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते आपल्या संपूर्ण पथकासह वसुली मोहिमेत सहभागी झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

महावितरणचा निर्णय; सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्रे सुरू राहणार
