महिला अत्याचार गुन्ह्यात कुडाळ पोलिसांची तत्परता
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ मधील एका महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्यात कुडाळ पोलिसानी तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा घडल्याच्या २४ तासाच्या आत मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. महीलांवर झालेल्या अन्यायाच्या गुन्हयामध्ये तात्काळ तपास करुन दोषारोप पत्र मा. न्यायालयात दाखल करण्याबाबत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग सौरभकुमार अगरवाल, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग कृषिकेश रावले यांनी आदेश पारीत केले होते. जेणे करुन अन्याय झालेल्या महीलांना न्याय तात्काळ मिळेल व आरोपीत यांना वेळीच शासन होण्यास मदत होणार आहे.
याबाबत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कुडाळ पोलीस ठाणे हददीत दि. २३ मार्च २०२५ रोजी गणेशनगर कुडाळ येथे राहणारी संबंधीत महिला फिर्यादी यांचे शेजारी राहणारे संशयित आरोपी संतोष गोविंद कुडाळकर (वय ५१ वर्षे) आणि सरस्वती गोविंद कुडाळकर, (वय ८४ वर्षे) (दोन्ही रा. गणेशनगर, कुडाळ) यांनी कुंपण साफ करीत असताना फणसाचे झाड तोडण्याबाबत फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली या कारणावरुन आरोपीत यांनी फिर्यादी यांना ढकलून अश्लिल बोलुन, शिवीगाळ करुन, मारण्याची धमकी दिली. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित आरोपी याचे विरुदध कुडाळ पोलीस ठाणे येथे दि. २३ मार्च २०२५ रोजी दु. ३.०२ वाजता वाजता गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. वरिष्ठानी दिलेल्या आदेशाप्रमाणे कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेवुन सदर गुन्हयाचा तपास सुरु करुन आरोपीत याचे विरुदध सबळ पुरावा गोळा करुन२४ तासाचे आत दोषारोप पत्र प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, कुडाळ यांचे न्यायालयात दाखल केलेले आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभ कुमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे अंमलदार देवानंद माने, सचिन गवस, जीवन कुडाळकर, योगेश मुंढे यांनी केली आहे.

