जागतिक महिला दिन विशेष
मिली मिश्रा | स्काय न्युज टुडे : एका छोट्याश्या गावांमधून जेव्हा एखादी व्यक्ती यशाचे उंच शिखर गाठते त्यावेळेला उर अभिमानाने भरून येतो. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण पाहणार आहोत मुंबई विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावलेल्या देवगड पुरळ-हुर्शी येथील कु. मानसी सुहास करंदीकर यांच्या बद्दल. सर्व प्रथम कु. मानसी सुहास करंदीकर यांना जागतिक महिला दिनाच्या स्काय न्यूज टुडे तर्फे शुभेच्छा.
मुंबई विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त मानसी यांचा प्रवास जेवढा आव्हानात्मक तितकाच अविस्मरणीय होता. त्यांना प्राणीशास्त्र या विषयाची पहिल्यापासूनच खूप आवड, त्यात मिळणारा आनंद आणि जिज्ञासा यांमुळे त्यांनी या विषयाची निवड केली. सोबत काही आव्हाने ही असतात. मात्र संपूर्ण प्रवासातील आव्हान पेलून त्यांनी यश संपादन केलं.
महिलांनी संशोधन क्षेत्रात अधिकाधिक यावे अशी त्यांची भावना आहे.
कु. मानसी सुहास करंदीकर बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पुरळ- हुर्शी या गावातील कन्यारत्न. त्यांचे दहावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण मराठी माध्यमातून झालं. मानसीच बारावी पर्यंतचं शिक्षण देवगड येथेच झालं. पदवी शिक्षण प्राणीशास्त्र या विषयात गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे झालं तर पदव्युत्तर शिक्षण डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे झालं. सध्या त्या बी. एड. अभ्यासक्रमाचं शिक्षण देवगड येथे घेत आहेत. अभ्यास सोबतच त्यांना गायनाची आवड आहे. तसेच सूत्रसंचालन, मराठी साहित्यलेखन, कविता, चारोळ्या, कथा लिहीण्याची आवड आहे. अनेक पारितोषिके त्यांनी प्राप्त केली आहेत.
मानसीना विविध कला आत्मसात करायला आवडतात. कल्पकतेने टाकाऊतून टिकावू वस्तू बनवायला आवडतात. वाचन, रांगोळी काढणं असे छंद त्यांनी जोपासले आहेत.
मानसी यांच्या आई - बाबांचं स्वप्न होतं की मानसीने उच्च शिक्षण घ्यावं, तीच खरी प्रेरणा होती. तसेच शालेय स्तरापासूनच उत्तम शिक्षक अर्थात गुरूसाथ त्यांना लाभत गेली. त्यामुळे या यशात प्रत्येक सद्गुरूचा तितकाच वाटा आहे. असेही त्या सांगतात.
संपूर्ण प्रवासात ताण हा मानसी यांना कधीच आला नाही किंबहुना त्यांनी घेतला नाही. कारण, त्याचं ध्येय पक्क होतं, आई बाबांचं स्वप्न डोळ्यासमोर होतं. त्यामुळे त्यांना अभ्यासाचा ताण कधीच जाणवला नाही.
मानसी म्हणतात संशोधनाला खूप महत्त्व आहे. शेवटच्या वर्षात एक प्रकल्प पुर्ण करून प्रबंध लिहावा लागतो. त्यांनी "तांदळातील टोक्यांना प्रतिबंध करण्यास नैसर्गिक किटकनाशक शोधणे" हा प्रबंध अल्प स्तरावर सादर केला होता. त्यात हळदीच्या पानांच्या पावडर चा परीणाम तपासून पाहीला होता. त्यात ५०% सकारात्मकता दिसून आलेली.
मानसी यांचा फोकस निश्चित आहे. विचार थोडे वेगळे आहेत. आणि याच वेगळे पणामुळे एकाग्रत्यामुळे त्यांनी आगळे - वेगळे यश मिळवले. मानसी स्वतः १००% देण्यावर विश्वास ठेवतात, त्यांना प्रतिस्पर्धी ही संकल्पना पटत नाही.
त्यामुळे त्यांना मोटिवेशन ची गरज नाही भासली, कारण त्यांचा निश्चयच दृढ होत.
शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणे एक चांगला शिक्षक, गुरू बनणे हे मानसीचे भविष्यातील नियोजन आहे. मानसीना पुढील सर्व शिक्षण भारतातच घ्यायचं आहे. आणि भारतासाठी व गावच्या विकासासाठी काम करण्यात मग्न रहायचं आहे.
आपल्या आवडीचं क्षेत्र ओळखा. योग्य मार्गदर्शन मिळवा. आयुष्यात चांगल्या गोष्टी वेचत चला. सत्कर्म करत पुण्याई कमवत चला. असे मानसी सांगते. मानसी आपल्या सर्व यशाचे श्रेय तिचे आई- बाबा सर्व शिक्षक. मार्गदर्शक या सर्वांना बहाल करते. सत्कर्म करायला मिळणे, नि:स्वार्थ पणे आपलं काम करत आयुष्य समाधानात आनंदाने जगणे हे खरं यश आहे. अशी यशाची व्याख्या मानसींच्या या प्रवासात आहे. मानसी नक्कीच तिला अपेक्षित असलेले सर्वोच्च यश संपादन करेल. यात मात्र शंका नाही. पुढील वाटचालीस स्काय न्यूज टुडे तर्फे त्यांना शुभेच्छा.



