पडेल देवगड येथील आदर्श व्यक्तीमत्व संजीवनी फडके
मिली मिश्रा | स्काय न्युज टुडे :
शिक्षण म्हणजे केवळ शाळेपुरते मर्यादित नसून ती आयुष्यभर चालणारी सोबत आणि गरज आहे. अनेक शिक्षक, शिक्षिका याच विचाराने प्रेरित होऊन ज्ञानदानाचे कार्य करतं असतात. काही वेळा असेही घडते शिक्षक सेवानिवृत्त होतात मात्र त्यांची ज्ञानयात्रा सुरूच असते. यापैकीच एक आदर्श व्यक्तीमत्व पडेल देवगड येथील संजीवनी फडके या सेवानिवृत्त शिक्षिका होय. निवृत्ती नंतर ही शिक्षण व विद्यार्थ्यांबद्दलच्या तळमळीखातर ग्रामीण भागातील मुलांना शिकवून त्यांच्या प्रगती साठी त्यांचे अखंडित शिक्षण सेवाकार्य सुरूच आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संजीवनी फडके यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
संजीवनी फडके यांनी १९८३ साली आपले एसएससी डी.एड. शिक्षण पूर्ण केले. एवढेच नव्हे तर डी.एड. च्या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांकही प्राप्त केला. त्यानंतर सुरु झाला शिक्षकी प्रवास. दरम्यान च्या काळात शिवाजी विद्यापीठ येथून बी.ए. (हॅानर्स) व एम.ए. मराठी- एस.एन.डी.टी, एम.ए. हिंदी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक येथून बी.एड. चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यांच्या शिक्षकी सेवा कार्यकाळ आदर्शवत असाच राहिला.
जुलै २०२३ मधे सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपण ज्ञान दानाचे कार्य करतंच राहायचे ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. संजीवनी फडके यांनी कोणतेही मानधन न घेता, कोणत्या ही मोबदल्याची अपेक्षा न करता, दर आठवड्यातून दोन दिवस, काही तास केवळ सेवाभावाने आपल्या गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याना शिकवायचे हा निश्चय केला. आपली कल्पना पडेल केंद्राचे केंद्रप्रमुख मा. जाधव सर व गटशिक्षण अधिकारी मा. काळे साहेब यांच्या समोर त्यांनी मांडली आणि तिर्लोट शाळा नं. १ येथे त्यांची ज्ञानयात्रा पुन्हा सुरु झाली.
आपल्याच गावची शाळा म्हणून या शाळेविषयी त्यांचा मनात विशेष ओढ होती तसेच येथील मुलांकरता काही करण्याची इच्छा देखील होती.
आजच्या शिक्षणातील बदल चांगले आहेत. मुले व शिक्षक टेक्नोसॅव्ही आहेत, त्याचा फायदा करून घेता येतो. कोरोनाच्या काळात पर्याय नव्हता म्हणून ऑनलाईन शिक्षण ठीक होते. त्या माध्यमातून विद्यार्थ्याना शिक्षणप्रवाहात टिकवून ठेवण्यास मदत झाली. परंतु मुले समोर असताना शिक्षक व विद्यार्थी ही जी आंतरक्रिया होते त्याला पर्याय नाही. आनंददायी शिक्षण घेता आले पाहिजे. मुलांची मानसिकता बघून, विचारात घेवून ज्ञानरचनावादाचा अवलंब करायला हवा. असे संजीवन फडके सांगतात.
ग्रामीण भागातील शाळामध्ये विशेष गोडवा आहे. शिक्षक व विद्यार्थी हे नाते अधिक दृढ असते.येथील मुले शिक्षक जे शिकवतात त्यावरच अवलंबून असतात. शिक्षकांप्रती आदरभावना प्रचंड असते. आमच्या विद्यार्थ्यांची मुलेदेखील शाळेत जावू लागली आहेत. “हा भाग जरा माझ्या मुलाला समजावून द्याल का?” असं जेव्हा ते विचारतात तेव्हा समाधान वाटते आणि नव्याने काही सापडतं. असे फडके मॅडम आपले अनुभव सांगतात.
आजची मुले स्मार्ट आहेत, हुशार आहेत, मात्र तेवढीच चंचल देखील आहेत. एक गोष्ट हाती घेवून त्यावर फोकस करणे यावर त्यांचा अधिक फोकस गरजेचा आहे. त्यासाठी शिक्षक पालक विशेष मेहनत घेतात. त्यासोबत शिक्षक व मुले यांच्यात असलेले आपुलकीचे नाते. खऱ्या अर्थाने महत्वपूर्ण ठरते.
सेवानिवृत्तीनंतरही संजीवनी फडके मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी शाळेशी जोडले राहून आपल्यातील शिक्षकाला सतत कार्यरत ठेवले आहे. कोणतेच मानधन न घेता निरपेक्षपणे सुरु ठेवलेले ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत असेच आहे. त्यांची ही ज्ञानयात्रा अशीच अखंडित सुरु राहावी. विद्यार्थी घडत राहावेत.

