मालवण | प्रतिनिधी : कोरोना काळात मृत्यू पावलेल्या वराडकर हायस्कूल कट्टाचे माजी विद्यार्थी, मुंबईस्थित शिक्षक दांपत्य कै. चित्तरंजन शंकर जठार व त्यांच्या सुविद्य पत्नी कै. सौ. चित्रा चित्ररंजन जठार या दाम्पत्याने वराडकर हायस्कूलच्या विकासकामांसाठी ५१ लाख १० हजार रुपये एव्हढी आर्थिक मदत देण्यात यावी अशी इच्छा मृत्युपत्रात नमूद केल्याने जठार दाम्पत्यांचे विश्वस्त म्हणून काम पाहणाऱ्या प्रमुख विश्वस्त श्री. शिवाजी बळवंत गावडे, श्री अविनाश जठार,श्री. विजय परशुराम मालडीकर,श्री. प्रकाश विष्णु मालडीकर, यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे पहिल्या टप्प्यात ११ लाख रुपयाच्या देणगीचा धनादेश सुपूर्त केला
कट्टा येथील जठार या दाम्पत्याने आपल्या मृत्यूपत्रात संपत्तीमधील काही रक्कम वराडकर हायस्कुलसाठी देण्याची इच्छा नमूद केली होती त्यानुसार त्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीचे विश्वस्त म्हणून काम पाहणारे शिवाजी गावडे (प्रमुख विश्वस्त), अविनाश जठार, विजय मालडीकर, प्रकाश मालडीकर यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष व कट्टा गुरामनगरीचे सरपंच शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, सल्लागार सुहास वराडकर आदी संस्था पदाधिकारी तसेच कट्टा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व हायस्कूलचे माजी विद्यार्थी नाना गिरकर यांच्याशी चर्चा केली यावेळी संस्थेच्या नियोजित इमारतीचा (सात खोल्यांचा) अंदाजे सव्वा कोटी रुपये खर्चाच्या इमारतीचा आराखडा समोर ठेऊन त्यानुसार कार्यरत राहू, असे संस्था पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाशिवरात्रीचे औचित्य साधत शिवाजी गावडे, विजय मालडीकर, प्रकाश मालडीकर यांनी कट्टा संस्था कार्यालयास भेट देऊन पहिल्या टप्यात ११ लाख रुपये एवढ्या रकमेचा धनादेश संस्था अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी उपस्थित संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व संस्था सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, संस्था सचिव विजयश्री देसाई, खजिनदार रविंदनाथ पावसकर, संचालक सुधीर वराडकर, संचालक महेश वाईरकर आदी संस्था पदाधिकारी व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार सुरेश मालडीकर, वराडकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, वराडकर इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषीकेश नाईक आदी उपस्थित होते. ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अविनाश जठार, नाना गिरकर, शेखर पेणकर, संस्था सचिव सुनील नाईक, नारायण पेणकर व काही संस्था हितचिंतकांनी विशेष मेहनत घेतली.

