कुडाळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार
जनतेची सेवा करायची आहे ; विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे : निलेश राणे
निलेश जोशी | कुडाळ : विधानसभा निवडणुक 2024 कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ-२६९ मधून शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून निलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला.
यावेळी खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, काका कुडाळकर आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार नारायण राणे यांसह उपस्थित नेतेमंडळी यांनी निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उमेदवारी अर्ज दाखल केल्या नंतर निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. आमच्या सोबत जनता आहे. जनतेची सेवा करणे, प्रश्न सोडवणे याला प्राधान्य राहील. गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ओसाड होता. आपल्या भूमीची आपल्या जनतेची जी हेळसांड झाली. त्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी सज्ज झालो आहे.
मी कोणावर टीका करणार नाही. जनतेची सेवा हेच लक्ष राहील. यापूर्वी जनतेने 28 व्या वर्षी खासदार बनवले. आता विधासभेसाठी पहिल्यांदा अर्ज भरणा करतोय. या मातीने येथील जनतेने राणे कुटुंबाला भरभरून प्रेम दिले. त्या जनतेची सेवा करायची आहे. जनतेला गृहीत धरणार नाही. जनतेच्या आशीर्वादाने मोठे मताधिक्य मिळवण्याचा प्रयत्न राहील. कुडाळ-मालवण सोबत सिंधुदुर्ग पर्यायाने महाराष्ट्रात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खा. राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, रिपाई नेते आणि सर्व महायुती पदाधिकारी यांचे निलेश राणे यांनी आभार मानले आहेत.
राजकारणात सक्रिय झाल्यापासूनचं काम माय-बाप जनतेसमोर स्पष्ट आहे आणि त्यांच्या निर्णयावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या कुडाळ - मालवण मतदारसंघातील एक ही मत आपण आता वाया जाऊ देणार नाही, आपली भूमी पुन्हा भ्रष्टांच्या हाती जाऊ देणार नाही. असेही निलेश राणे या निमित्ताने म्हणाले.
निलेश राणेंच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी केली गर्दी
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणतीही जाहीर सभा, रॅली असं शक्तिप्रदर्शन न करता प्रेमापोटी आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी कुडाळच्या निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काका कुडाळकर तसंच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे उपस्थित होत्या.
निलेश राणे अर्ज भरणार म्हणून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवाराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पोलिसांनी १०० मीटर अंतरावर बॅरीगेट्स लावून सर्व कार्यकर्त्यांना रोखून धरलं होत. सर्वच गेटवर पोलीस आणि सीएसपीएफ जवानांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महायुती पदाधिकारी यांच्या सोबतच निलेश राणे यांचं ढोलताशांच्या गजरात आगमन झालं. मुख्य रस्त्यावरून चालतच निलेश राणे आणि नारायण राणे, नितेश राणे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. त्यांच्या सोबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपच्या संध्या तेरसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काका कुडाळकर, अशोक दळवी तसच महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या गेट वर बाकीच्यांना अडवून फक्त पाचजणांना आत सोडण्यात आलं. त्यांनतर निलेश राणे यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. हि निवडणूक कोणावरही टीका न करता शांततेत लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, प्रमोद जठार, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालूकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, राजन गांवकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, बबन शिंदे, रणजित देसाई, आनंद शिरवलकर, दीपलक्ष्मी पडते, संध्या तेरसे, राजू राऊळ, आनंद शिरवलकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, आर के सावंत, प्रकाश मोर्ये, .मोहन सावंत, रवीकिरण तोरस्कर, आशिष हडकर, राजन माणगावकर, छोटू ठाकुर, सौ. अदिती सावंत, अन्वेषा आचरेकर, आदी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

