मालवण : बॅ. नाथ पै सेवांगण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जीवनदर्शन ही स्पर्धा परीक्षा घेतली. सेवांगणचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनी येथे बोलताना केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे पार पाडला. यावेळी मिलिंद जाधव हे बोलत होते. याप्रसंगी बार्टीचे मालवण समतादूत संग्राम कासले, विश्वस्त दीपक भोगटे, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मिलिंद जाधव म्हणाले बॅ. नाथ पै सेवागणने राबवलेला उपक्रम शासन स्तरावरून राबवणे गरजेचे आहे. जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वांपर्यंत पोहोचेल. या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे. यानंतरही सेवांगणने अशा पद्धतीचे दर्जेदार उपक्रम राबवावे.

बार्टीचे समतादूत संग्राम कासले म्हणाले, महामानवांना जाती आणि धर्मामध्ये बंदिस्त करू नका. महामानवांचे विचार समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहेत. सेवांगणच्या माध्यमातून महामानवाचे विचार हे सर्व घटकांपर्यंत पोहोचवले जातात.
दीपक भोगटे म्हणाले, या परीक्षेसाठी मालवण तालुका व परिसरातील हायस्कूल तसेच गोवा राज्यातील ४ शाळात अशा एकंदर ४० हायस्कूल व १० प्राथमिक शाळातील ४ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले व सर्व विद्यार्थ्याना सहभाग प्रमाणपत्रे वितरीत केली असून गोवा वडाचा पाट कट्टा व मालवण याठिकाणी बक्षीस समारंभ संपन्न झाला. त्यांनी सेवांगणच्या वतीने शिक्षक पालक
विद्यार्थी यांचे आभार मानले. लक्षीकांत खोबरेकर यांनी सेवांगणच्या विविध उपक्रमाची माहिती दिली व सेवांगणच्या वतीने छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीना अभिवादन केले.
स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवंतांना विविध पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. तर सहभागी शाळांमधील शिक्षकांना संविधानाची प्रास्ताविका असलेली सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी आजगावकर संजय आचरेकर, रुचिरा चिंदरकर श्रीमती कदम श्री. बागवे, मुख्याध्यापक दीपक जाधव, मुख्याध्यापक श्रीकृष्ण बागवे, शिक्षिका अक्षता तांबे, प्रवीण पारकर, सेंन्ट्रा लोबो , सौ. करमरकर विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.
सूत्रसंचलन शैलेश खांडाळेकर यांनी केले.

