शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा घणाघात
मालवण | प्रतिनिधी : चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करणे हेच काम उबाठा माजी आमदार यांना उरले आहे. मुळात २०१६ ते २०२४ या त्यांच्याच कार्यकाळात ३५२ मच्छिमारांना बांधकाम प्रशनी नोटिसा आल्या होत्या, मग तेव्हा त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही? अकलेचे तारे तोडणे हेच वैभव नाईकांचे काम आहे. असा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला.
नाईकांनी आपल्या कार्यकाळात साध्या आजाराचे रूपांतर कॅन्सरमध्ये करून ठेवले आहे. अशी परिस्थिती संपुर्ण मतदार संघात गेल्या दहा वर्षात निर्मण केली. आता सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आमदार निलेश राणे सर्व प्रश्नांवर प्रभावी शस्त्रक्रिया करत आहेत," अशा शब्दांत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी नाईकांचा समाचार घेतला.
शिवसेना महायुती आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी संजय पडते, काका कुडाळकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, सुनील घाडीगावकर, मकरंद राणे, भाऊ मोरजे, सूर्यकांत फणसेकर, राजू बिडये, भाई मांजरेकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१४ पासून आमदार असताना वैभव नाईक यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यांच्याच काळात सर्वाधिक नोटिसा आल्या असताना, आता ते केवळ राजकारण करण्यासाठी अकलेचे तारे तोडत आहेत. मात्र मच्छिमार बांधवांना नोटिसा मिळताच आमदार निलेश राणे यांनी संबंधित मच्छिमार कोणत्या पक्षाचा आहे, हे न पाहता त्यांना आधार दिला. गरीब जनतेच्या उदरनिर्वाहाचे साधन वाचवण्यासाठी ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांना निश्चितच न्याय मिळवून देतील. मात्र वैभव नाईक फक्त फसवणूक करत आहेत, असा आरोप सामंत यांनी केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी दिलेले उमेदवार विकले गेले किंवा त्यांनी माघार घेतली. ठाकरे शिवसेनेचे जहाज आता भरकटले असून नाईकांनी आधी आपला उरलासुरला पक्ष सांभाळावा, किंवा ते दिशा बदलत आहेत असेही दिसून येत आहे. असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासाची गंगा वाहत आहे. याच कामावर विश्वास ठेवून जनतेने महायुतीला निवडणुकीत मोठे यश दिले आहे. वैभव नाईक यांनी आता आपली केविलवाणी धडपड थांबवावी. निलेश राणे ज्या वेगाने काम करत आहेत, ते पाहता या मतदारसंघात त्यांचा स्पर्धा करणारा कोणीही उरलेला नाही. नाईक यांनी कितीही चक्रव्यूह रचले, तरी निलेश राणेंचा अश्वमेध रोखण्याची ताकद आता कोणातही नाही असेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. मच्छिमार बांधवांवर ओढवलेले हे संकट कायमस्वरूपी टळेल, असा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. आमदार निलेश राणे हे कुडाळ-मालवणचे पालकत्व स्वीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
▪️अमित खोत, मालवण

