मालवण | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात आणि ढोल ताशाच्या गजरात मोठ्या दिमाखात शिव स्वराज्य यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने मालवण येथे शिव प्रेमींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

यावेळी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना देण्यात आली. शहरातून भव्य मिरवणुक निघाली. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत व प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांचा अश्वारूढ पुतळा व स्मारकाचे ८ मार्च रोजी टोकियो जपान येथे अनावरण केले जाणार आहे. या अश्वारूढ पुतळ्याचे शिवस्वराज्य यात्रेद्वारे भारत भ्रमण करून जपानकडे रवाना केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बिजनेसमन फोरम, सेडॉन इंटरनॅशनल, आम्ही पुणेकर, एडोगाव इंडिया कल्चर सेंटर जपान, असोसिएशन ऑफ इंडियन तसेच शिवप्रेमी संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा राजधानी सातारा येथे बुधवारी प्रारंभ झाला. शुक्रवारी ही यात्रा मालवणात आली असता यात्रेचे कुंभारमाठ येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी यात्राध्यक्ष हेमंत जाधव, मुख्य सल्लागार उत्तमराव मांढरे, उपाध्यक्ष एड. मिलिंद पवार, विश्वस्त शाम दौडकर, आयेशा सय्यद, पिनल वानखेडे, डॉ. शिवशाहीर विजय तनपुरे, सुदेशना परमार यांसह भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, प्रीती सावंत, भाऊ सामंत, रमाकांत सावंत, भूषण साटम, भाजपा शहरध्यक्ष बाबा मोंडकर, हॉटेल उद्योजक विनय गांवकर, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, शिवसेना जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख निलम शिंदे, भाजपा पदाधिकारी पुजा वेरलकर, शिवसेना पदाधिकारी अंजना सामंत, शहरप्रमुख बाळू नाटेकर, सरपंच पुनम वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, सौरभ ताम्हणकर,पुजा वेरलकर, अंजना सामंत यांचा अन्य शिवप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.


ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार विपुल आणि विराज खटावकर यांनी शिवछत्रपतीं चा अश्वारूढ पुतळा साकारला आहे. हा पुतळा जपान टोकियो येथे उभारण्यात येणार आहे. सातारा, कोल्हापूर, पणजी, बेळगाव, बेंगलोर, हैदराबाद, नागपूर, ग्वाल्हेर, दिल्ली, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत, मुंबई असा मार्गक्रमण करून ही रथयात्रा पुण्यात पोहोचेल. त्यानंतर शिवछत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा जपानकडे मार्गस्थ केला जाईल. 7 हजार किलोमीटरहून अधिक अंतर यात्रा पूर्ण करणार आहे. नऊ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामधून यात्रा प्रवास करणार आहे.

