मालवण नगरपरिषद येथे शहरातील विकासकामां बाबत आढावा बैठक
विकासकामांना गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
भाजी मार्केट, नाट्यगृह, रॉक गार्डन, नमो उद्यान, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पाणीपुरवठा, भुयारी गटारसह विविध प्रकल्पांचा आढावा
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद सभागृह येथे जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या विविध विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील प्रलंबित तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस नगराध्यक्षा ममता वराडकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बैठकीत मालवण शहरातील विविध महत्त्वाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये भाजी मार्केट नूतनीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह वाणिज्य संकुल, नाट्यगृह नूतनीकरण, रॉक गार्डन सुशोभीकरण, नमो उद्यान विकसित करणे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नगरोत्थान योजना, पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजना आदी कामांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांनी शहरातील विकासकामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश नगरपरिषदेच्या अभियंत्यांना दिले. विकासकामांची गुणवत्ता आणि वेळेत पूर्तता याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशा सूचना त्यांनी केल्या
दरम्यान, काही विकासकामे संथ गतीने सुरू असल्याचे किंवा संबंधित ठेकेदारांकडून कामात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कामचुकार ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत (Blacklist) टाकण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्याबाबतही सूचना करण्यात आली.
मालवण शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा केला जात असून, या बैठकीमुळे प्रलंबित कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरातील पायाभूत सुविधा, पर्यटनपूरक विकास तसेच नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
▪️अमित खोत | मालवण

कामचुकार ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करा : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
