मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजन
मालवण | प्रतिनिधी : डिजिटल बँकिंगचा वाढता वापर आणि त्यातून होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी सारस्वत बँक, मालवण शाखेच्या वतीने मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सायबर सुरक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विशेषतः UPI, ATM, ऑनलाइन बँकिंग, OTP, PIN, पासवर्ड, संशयास्पद लिंक तसेच अनोळखी फोन कॉलच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक याबाबत आवश्यक खबरदारीची माहिती दिली जाणार आहे.
सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता कोणती पावले तातडीने उचलावीत, बँकेशी कसा संपर्क साधावा, तसेच सायबर गुन्ह्याची तक्रार कुठे व कशी करावी, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक असून, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या मार्गदर्शन मेळाव्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन सारस्वत बँक मालवण शाखेचे शाखा व्यवस्थापक व कर्मचारीवृंदाने केले आहे.
▪️अमित खोत | मालवण

सारस्वत बँक मालवण येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन मेळावा..
