भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश; सिंधुदुर्गातील ९१६ पात्र कामगारांना मिळणार लाभ : जिल्हा सचिव हेमंतकुमार परब
मालवण तालुक्यातही पात्र घरेलू कामगारांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भारतीय मजदूर संघाने यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आंदोलनाची हाक दिल्यानंतर प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यातील तब्बल ९१६ पात्र घरेलू कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.
दरम्यान, मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मालवण तालुक्यातील २३५ पात्र घरेलू कामगारांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची कार्यवाही करण्यात आली. यावेळी रजिस्ट्रेशनच्या पावत्यांचे वितरण मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनामार्फत सन २०२४ मध्ये आदेश काढून ३१ जुलै २०२४ पूर्वी नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांना संसारोपयोगी भांडी संच देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये घरेलू कामगारांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले होते.
मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ घरेलू कामगारांना शासनाच्या आदेशानुसार भांडी संच देण्याबाबत दिरंगाई होत होती. या प्रश्नी भारतीय मजदूर संघाने कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत प्रश्न लावून धरला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र घरेलू कामगारांना भांडी संच देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
यानंतर भारतीय मजदूर संघ, सिंधुदुर्गच्या वतीने सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे पात्र घरेलू कामगारांना भांडी संचाचे वाटप तसेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेला विलंब होत असल्याने संघटनेने ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घरेलू कामगारांचे आंदोलन व निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पात्र घरेलू कामगारांचे भांडी संचासाठीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन तातडीने सुरू केले.
मालवण तालुक्यातील २३५ कामगारांचे रजिस्ट्रेशन
रविवारी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात मालवण तालुक्यातील २३५ पात्र घरेलू कामगारांसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची कार्यवाही करण्यात आली. यावेळी रजिस्ट्रेशनच्या पावत्यांचे वितरण मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक ललित चव्हाण, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरी चव्हाण, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब, सिमा धुरी, भाग्यश्री माळकर, कल्पीता जोशी तसेच भांडी संच वाटप ठेकेदार एजन्सीचे कर्मचारी प्रवीण जाधव, रवी कदम, स्वाती आणावकर आदी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर सिंधुदुर्गातील पात्र घरेलू कामगारांसाठी भांडी संचाच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

घरेलू कामगारांना भांडी संच देण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू
