आय.व्ही. ॲक्टअंतर्गत नोंदणीकृत नौकांना खोल समुद्रात प्रवासी वाहतुकीस मनाई ; आय.आर.एस. नोंदणी बंधनकारक
मालवण | प्रतिनिधी : पर्यटन हंगाम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नौकांच्या जलसफरीबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. आय.व्ही. ॲक्ट १९१७ अंतर्गत नोंदणीकृत नौकांना आय.व्ही. मर्यादेबाहेर, खोल समुद्रात प्रवासी वाहतूक करता येणार नसल्याचे बंदर निरीक्षक, मालवण यांनी स्पष्ट केले आहे.
मालवण बंदरातून निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफरीसाठी घेऊन जाण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी जलपर्यटन व्यावसायिकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर बंदर निरीक्षक, मालवण यांनी संबंधित नौका मालक व चालकांना पत्राद्वारे नियमांची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या पत्रानुसार, निवती लाईट हाऊस हे जवळच्या किनाऱ्यापासून साधारण ५.२९ नॉटिकल मैल अंतरावर खोल समुद्रात आहे. आय.व्ही.
ॲक्ट १९१७ अंतर्गत नोंदणी असलेल्या नौकांना त्यांच्या निर्धारित आय.व्ही. मर्यादेच्या बाहेर जलप्रवासी वाहतूक करता येत नाही. त्यामुळे अशा नौकांमधून निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना घेऊन जाणे नियमबाह्य ठरू शकते.
निवती लाईट हाऊस परिसरात नौकेद्वारे प्रवासी वाहतूक करावयाची असल्यास संबंधितांनी इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) यांच्याकडे नौकेची नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, आय.व्ही. अॅक्ट १९१७ अंतर्गत नोंदणीकृत नौकांद्वारे आय.व्ही. मर्यादेबाहेर खोल समुद्रात प्रवासी वाहतूक करणे ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यातून समुद्री सुरक्षा नियम तसेच शासन नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खोल समुद्रात प्रवाशांना घेऊन जाताना एखादा अपघात झाल्यास किंवा जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित नौका मालक व चालकावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नौका मालक व चालकांनी नियमांची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जलपर्यटन व्यावसायिकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पोलीस विभाग, महाराष्ट्र सागरी मंडळ, वन विभाग तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिक उपस्थित होते. त्यानंतर निवती लाईट हाऊस जलसफरीबाबत हे निर्देश देण्यात आले आहेत.
निवती लाईट हाऊस हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असले तरी पर्यटकांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य असल्याने नियमांचे पालन करूनच जलपर्यटन व्यवसाय करावा, अशी भूमिका महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतली आहे.
▪️अमित खोत | मालवण

निवती लाईट हाऊस जलसफरीला नियमांचा ‘ब्रेक’
