विद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश
मालवण | प्रतिनिधी : भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे हरितसेना उपक्रमांतर्गत यंदाची राखी पौर्णिमा पर्यावरणपूरक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. परंपरेचा आदर राखतानाच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजविण्याचा कौतुकास्पद उपक्रम यावेळी राबविण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी पान-फुले, सूक्ष्म नैसर्गिक साहित्य आणि रंगीत धाग्यांचा वापर करून आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. या राख्या वटवृक्षाला बांधून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही पर्यावरणपूरक राख्या बांधून पारंपरिक स्नेहाचे दर्शन घडविले. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद कुबल यांनी वटवृक्षाचे महत्त्व तसेच वृक्षसंरक्षणाची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असून, विद्यार्थ्यांनी अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्यांमुळे संपूर्ण कार्यक्रम प्लास्टिकमुक्त ठरला. यावेळी पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याच्या विविध पद्धती, जैवविविधता जपण्याचे महत्त्व तसेच दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे उपाय याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. घरच्या घरीदेखील प्लास्टिकमुक्त राख्या तयार करून पर्यावरणपूरक सण साजरे करावेत, असे आवाहन करण्यात आले.
याचबरोबर आगामी वृक्षारोपण मोहिमेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनात विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे, असा संदेशही देण्यात आला. शाळेच्या या हरित उपक्रमाचे पालक आणि स्थानिक समुदायाकडून कौतुक करण्यात आले.कार्यक्रमावेळी प्रशालेच्या शिक्षिका वेदिका दळवी, प्रतिभा केळूसकर, अन्वी पाटकर, MSAT विभागाचे निदेशक जगन्नाथ आंगणे यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते. परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालत शाळेने राबविलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूलमध्ये परंपरेचा आदर आणि पर्यावरण वृत्ती रुजवण्याचे कौतुकास्पद कार्य
