जवानांना राखी बांधून त्यांच्या देशसेवेप्रती व्यक्त केली कृतज्ञता
मालवण | प्रतिनिधी : रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थिनींनी देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) जवानांसोबत आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा केला. विद्यार्थिनींनी जवानांना राखी बांधून त्यांच्या देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थिनींनी NDRF टीममधील जवानांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेम, विश्वास आणि आदराचे प्रतीक असलेल्या राख्या बांधल्या. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या जवानांना बांधत ‘देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना बहिणीच्या प्रेमाची राखी’ असा भावनिक संदेश दिला.
आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या NDRF जवानांप्रती विद्यार्थिनींनी व्यक्त केलेला आदर आणि कृतज्ञता पाहून कार्यक्रमाचे वातावरण भावनिक झाले. यावेळी NDRF जवानांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जवानांनीही विद्यार्थिनींच्या या प्रेमळ आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. रक्षाबंधनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी देशसेवा, बंधुभाव, कृतज्ञता आणि माणुसकीचा सुंदर संदेश समाजापुढे ठेवला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबाराव राणे, संस्थेचे सचिव घनश्याम राणे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश तावडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना देसाई मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन संगम चव्हाण सर यांनी केले. या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.
▪️अमित खोत | मालवण

न्यू इंग्लिश स्कूल पेंडूरच्या विद्यार्थिनींचे एनडीआरएफ जवानांना रक्षाबंधन
