काजल तारी द्वितीय, तेजस्विनी सारंग तृतीय : सुजाता शेलटकर चतुर्थ
भाजपा महिला शहराध्यक्षा अन्वेषा आचरेकर व पदाधिकारी यांच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त उत्साहात आयोजन
मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी, मालवणच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त महिलांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दांडी येथील रिक्षा स्टँड, दांडी शाळा परिसरात झालेल्या या स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत चांदणी कुबल यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले.
स्पर्धेत काजल तारी यांनी द्वितीय, तर तेजस्विनी सारंग यांनी तृतीय क्रमांक मिळविला. चतुर्थ क्रमांक सुजाता शेलटकर यां विजेत्या ठरल्या.
महिलांमध्ये उत्साह, पारंपरिक सण-उत्सवांची जपणूक तसेच स्थानिक महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन भाजपाच्या वतीने करण्यात आले होते. नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक वातावरणात रंगलेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनीही मोठी उपस्थिती लावून प्रतिसाद दिला.
स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकासाठी ५,५५५ रुपये (अन्वेषाआचरेकर पुरस्कृत), तर द्वितीय क्रमांकासाठी ३,३३३ रुपये पारितोषिक (सेजल परब पुरस्कृत). चतुर्थ (ओम मालंडकर) स्पर्धेच्या निमित्ताने महिलांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, मालवण यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा नगरपरिषद महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर,भाजपचे उपतालुका अध्यक्ष संमेश परब, जिल्हा चिटणीस तथा माजी नगरसेविका सौ. सेजल परब, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला स्पर्धेचे स्वरूप देत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग मिळविण्यात आयोजकांना यश आले. अशा उपक्रमांमुळे पारंपरिक खेळ आणि लोकसंस्कृतीचे जतन होण्याबरोबरच महिलांमधील उत्साह आणि सहभाग उत्स्फूर्त होता.

दांडी येथे भाजपच्या वतीने आयोजित महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत चांदणी कुबल विजेती
