कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून महिला बचत गटाची स्थापना
अमित खोत | मालवण : कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीतील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत कुंभारमाठच्या पुढाकारातून ‘नवजीवन महिला समूह’ या महिला बचत गटाची स्थापना करण्यात आली. सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, पंचायत समिती सदस्या सौ. मानसी भोगावकर आणि उमेद सीआरपी सौ. सारिका फोंडेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे.
महिलांमध्ये बचतीची सवय, आर्थिक शिस्त, स्वावलंबन तसेच सामूहिक विकासाची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने या बचत गटाची स्थापना करण्यात आली. आदिवासी कातकरी समाजातील महिलांनी एकत्र येत विकासाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, भविष्यात या माध्यमातून महिलांना विविध स्वयंरोजगार व लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
‘नवजीवन महिला समूह’च्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी सौ. सकू किसन निकम, उपाध्यक्षपदी सौ. लक्ष्मी गोपाळ पोवार तर सचिवपदी सौ. मंजुळा रमेश कोळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. मानसी भोगावकर, सरपंच सौ. पुनम वाटेगावकर, उपसरपंच श्री. जीवन भिवा भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रमोद निकम, उमेद सीआरपी सौ. सारिका फोंडेकर, अंगणवाडी सेविका सौ. भक्ती मांजरेकर तसेच कातकरी वस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामपंचायत कुंभारमाठकडून कातकरी वस्तीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावरही अधिक भर देण्यात आला आहे. बचत गटाच्या माध्यमातून नियमित बचत, सामूहिक निधी उभारणी आणि उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेत महिलांना छोटे-मोठे उद्योग, स्वयंरोजगार व विविध आर्थिक उपक्रम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
कातकरी वस्तीचा विकास केवळ मूलभूत सुविधा पुरविण्यापुरता मर्यादित न ठेवता, तेथील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने ग्रामपंचायत कुंभारमाठने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि आदर्शवत ठरणार आहे.

कुंभारमाठ | कातकरी महिलांच्या स्वावलंबनाला ‘नवजीवन’ची साथ!
