गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण : शाळेला लॅपटॉप भेट
मालवण : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तिरवडे गावातील गरजू मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, या सामाजिक उद्देशाने विशेष उपक्रमाचे आयोजन करून दोन गरजू मुलींना मोफत सायकल व शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. तिरवडे गावा साठी खऱ्या अर्थाने याेगदान देणारे माजी सरपंच विहंग गावडे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे यांनी आपल्या मनोगतात कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार निलेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांवर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे, आधुनिक डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करणे, या अनुषंगाने आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या प्रयत्नांचे त्यांनी आपल्या मनोगतात विशेष उल्लेखाने विवेचन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
तसेच या कार्यक्रमाच्याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विश्वास कृष्णा गांवकर, कुडाळ-मालवण विधानसभेचे साेशल मिडीया प्रमुख किसन मांजरेकर, मुख्याध्यापक साै. उन्नती कराळे, शिक्षक गणेश खरात, शिक्षिका शिवकन्या सांगवे, साै. भाग्यश्री भाेसले, पंचायत समिती सदस्य संताेष गावडे, उपसरपंच सुशील गावडे, माजी उपसरपंच सन्माननीय विकास गावडे उपस्थित होते.
गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा देणारा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी आणि कौतुकास्पद ठरला.

तिरवडे येथे प्रेरणादायी सामाजिक उपक्रम!
