विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मालवणमध्ये शुक्रवारी भव्य टु-व्हीलर तिरंगा रॅली
मालवण | प्रतिनिधी : भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र, भारताचे विभाजन होऊन मिळालेले हे स्वातंत्र्य असल्याची भावना राष्ट्रवादी नागरिकांच्या मनात आजही आहे. याच भावनेला सामुदायिक स्वरूपात अभिव्यक्त करण्यासोबतच अखंड भारताचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प आणि नव्या पिढीमध्ये त्याबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवणमध्ये ‘अखंड भारत, समर्थ भारत’ या संकल्पनेवर आधारित टु-व्हीलर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद, मालवण यांच्या वतीने आयोजित ही रॅली शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता मालवण एसटी स्टँड येथून मार्गस्थ होणार आहे. या रॅलीमध्ये राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद मालवणचे अध्यक्ष भाऊ सामंत यांनी केले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीचे स्वप्न राष्ट्रभक्त नागरिकांनी अनेक वर्षे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपले. त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीर संदर्भातील कलम ३७० रद्द करण्याचे स्वप्नही अनेक दशकांपासून राष्ट्रवादी नागरिक पाहत होते. जनतेच्या सामूहिक इच्छाशक्तीमुळे ही दोन्ही स्वप्ने प्रत्यक्षात साकार होताना देशाने पाहिली आहेत. त्याच धर्तीवर अखंड भारताचे स्वप्नही जनतेच्या प्रभावी सहभागातून आणि सामूहिक संकल्पातून भविष्यात साकार होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
रॅलीचा मार्ग
मालवण एसटी स्टँड येथून रॅलीला प्रारंभ होऊन बाजारपेठ –भरड – मालवण स्टँड – देऊळवाडा – कुंभारमाठ मार्गे रॅली हुतात्मा स्मारक येथे पोहोचेल. तेथे रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे.
राष्ट्रभक्त नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अखंड भारत, समर्थ भारत!
