मालवण बंदर जेटी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करणाऱ्या नवीन ३५ व्यवसायिकांना उद्देशपत्र वितरण
आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ; मंत्री नितेश राणे यांच्या आदर्शवत कार्याचा केला विशेष गौरव
मालवण | प्रतिनिधी : नागरिक व पर्यटकांना अधिकाधिक सोईसुविधा निर्माण करतं असताना राणे साहेबांनी ज्या प्रकारे विकासाची मुहूर्तमेढ रोवत गतिमान विकासाकडे वाटचाल केली. ती विकासाची गती राणे साहेबांच्या मार्गदर्शनात पुढे नेण्याचे काम आमदार निलेश राणे यांच्या सोबतीने आम्ही करतं आहोत. गेल्या पाच वर्षात मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढती राहिली आहे. वार्षिक 6 लाख पर्यटक संख्या पोहचली आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी पर्यटक संख्या वाढत आहे. त्यामुळे मालवणच्या किनारपट्टीवर अधिकाधिक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून नव्याने ३५ जणांना बंदर जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी उद्देशपत्र देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्याच प्रकारे अधिकाधिक रोजगार संधी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकारातून दिल्या जाणार आहेत. यासोबतच स्थानिक स्टॉलधारकांना कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी एमएमबीची नवी शॉप पॉलिसी लागू केली जाईल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमानुसार बंदर तसेच मत्स्यव्यवसाय विभागात ही लवकरच ४५० जागांची भरती प्रक्रिया राबवली जाईल. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार एनसीडीसी योजनेतुन मच्छिमाराना दिलासा दिला जाईल. तसेच डिझेल दर डिटेल स्वरूपात होण्याबाबत सकारात्मक निर्णय केंद्र व राज्य स्तरावरून होईल. सागरमाला 2 अंतर्गत किनारा विकास तसेच महाराष्ट्र राज्याची संपूर्ण किनारपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकलपनेतून जलवाहतूकेने जोडण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ प्रयत्नाशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
मालवण बंदर जेटी ते ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला या जलमार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू करणाऱ्या नवीन पात्र ३५ व्यवसायिकांना उद्देशपत्रबाला वितरण करण्याचा समारंभ दैवज्ञ भवन, मालवण येथे मत्स्यव्यावसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मालवण मधील ३५ नव्या होडी व्यवसायिकांना उद्देशपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि प. अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मेरीटाइम बोर्डाचे अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संदीप भुजबळ, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, किसन मांजरेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, स्थानिक होडी व पर्यटन व्यावसायिक व अन्य उपस्थित होते. अक्षय सातार्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी कॅप्टन संदीप भुजबळ व सुधीर देवरे यांनी मेरीटाइम बोर्डाच्या उपक्रमांची माहिती दिली. हजारो कोटी निधीच्या माध्यमातून बंधारे व अन्य विकास प्रकल्प मंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून होतं आहेत. अनेक प्रस्तावित आहेत. असे सुधीर देवरे यांनी सांगितले.
यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले, किल्ले सिंधुदुर्ग दर्शनास सुमारे साडेपाच लाख पर्यटक येतात. ही संख्या भविष्यात आणखी वाढणार आहे. त्या दृष्टीने किनारपट्टी जलवाहतुकीने जोडण्याचे आणि विकसित करण्याचे काम सुरू आहे. मच्छीमारांच्या हितासाठी राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या योजनेतून कर्जमाफी मिळवून देण्यासाठी आणि सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आमदार निलेश राणे जे जे विकासाचे प्रश्न मांडतील, त्यांना न्याय देण्याचे काम आपण करू. येथील काहीजण माझ्याकडे येऊन निवेदने देतात, मात्र त्यांनी ही निवेदन येथील आमदार निलेश राणे यांच्याकडे द्यावीत, आमच्या भावांमधील नाते हे फेव्हिकोलच्या जोडसारखे मजबूत आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच सिंधुरत्न योजनेअंतर्गत दैवज्ञ भवन हॉलच्या दुरुस्ती व सुधारणेचे काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे म्हणाले, किल्ला प्रवासी वाहतुकीसाठी नव्या परवानग्या मिळण्याची मागणी अनेक वर्षांनी अखेर मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पुर्ण होतं आहे. राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या कर्जातून येथील मच्छीमारांना वगळण्यात यावे आणि मच्छिमारांना सवलतीच्या दरात डिझेल मिळावे. याही बाबतीत मंत्री नितेश राणे यांच्या माध्यनातून सकारात्मक निर्णय शासन स्तरावर होईल. असे सांगताना मत्स्यव्यवसाय खात्याला कृषीचा दर्जा नितेश राणे यांच्यामुळेच मिळाला आहे, त्यामुळे मच्छीमारांचे उर्वरित प्रश्नही ते नक्कीच सोडवतील, शेतकरी यांच्या प्रमाणे मच्छिमारांचे कर्ज ही माफ होईल. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात उल्लेख केलेले एकमेव मंत्री नितेश राणे
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्रालयाचा कारभार करत असताना आदर्शवत काम मंत्री नितेश राणे करत आहे. पालकमंत्री म्हणून नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा विकास निधी त्यांच्या माध्यमातून येत आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अधिवेशनात शेवटच्या आठवड्यात प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मंत्री नितेश राणे या एकमेव मंत्र्यांचा उल्लेख केला. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी मंत्री नितेश राणे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला.
कायतरी गडबड हा....
मंत्री नितेश राणे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यस्तरावर आदर्शवत आणि दर्जेदार असे काम करत आहे. मुख्यमंत्र्यांकडून त्यांच्या कामाचा गौरव होत असताना सिंधुदुर्गातही मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून अनेक विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात विकास निधी व गतिमान विकास सुरू आहे. या अभिमानास्पद कामगिरी बाबत कौतुक होत असताना अनेकांच्या भुवया उंचावती किती कौतुक झाले असे सांगणारे चिकित्सक इकडे आहेत. हे कौतुक ऐकून काही जण काहीतरी गडबड आहे असेही म्हणतील....मात्र जे वास्तव आहे तेच मी मांडले. अशी दिलखुलास भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली.
▪️अमित खोत, मालवण

