नगरसेवक मंदार ओरसकर, बबन वाघ यांच्या पाठपुराव्यातुन समस्या मार्गी
मालवण : मालवण शहर प्रभाग क्रमांक ८-ब, गवंडीवाडा येथील गवंडीवाडा ते भरड मार्गावरील वळणावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. वळणावर झाडी वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच वीज वाहिन्यांवरही झाडी वाढल्याने समस्या निर्माण झाली होती.
याबाबत येथील बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांना माहिती दिली. समस्या लक्षात घेऊन ओरसकर यांनी तात्काळ नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत संबंधित ठिकाणी वाढलेली झाडी हटविण्याची कार्यवाही करण्याची मागणी केली.
त्यानुसार नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रस्त्याच्या वळणावरील वाढलेली झाडी तोडून परिसर मोकळा करण्यात आला. तसेच या परिसरातील वीज वाहिनीवर वाढलेल्या वेलींचीही समस्या निदर्शनास आल्याने MSEB कर्मचाऱ्यांना बोलावून वीजवाहिनीवरील वेली काढून घेण्यात आल्या.
या कामात रोशन कांबळी, ऋतिक बटाव आणि रॉकी मिठबावकर यांनीही सहकार्य केले. त्यामुळे गवंडीवाडा-भरड मार्गावरील धोकादायक वळण वाहनचालकांसाठी अधिक सुरक्षित झाले आहे.
नागरिकांची समस्या समजून घेत नगरसेवक मंदार ओरसकर व बबन वाघ यांच्या माध्यमातून तात्काळ करण्यात आलेल्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या समस्यांकडे तत्परतेने लक्ष देऊन त्या सोडविण्याची भूमिका घेतल्याबद्दल कौतुक होत आहे.

