शेकडो नागरिकांची मालवण नगरपरिषदेकडे ठाम मागणी
‘ग्राहकहित, महिला-ज्येष्ठांची सोय आणि शेतकऱ्यांचा विचार व्हावा
नगराध्यक्ष व प्रशासनास सविस्तर निवेदन सादर
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील देऊळवाडा येथे गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेला आठवडा बाजार बंद करू नये, अशी ठाम भूमिका मालवण शहर व परिसरातील नागरिकांनी घेतली असून याबाबतचे सविस्तर निवेदन नगराध्यक्ष सौ. ममता मनोहर वराडकर तसेच मुख्याधिकारी, मालवण नगर परिषद यांना सादर करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीचा, ग्राहकांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाशी निगडित असलेला हा बाजार बंद करण्याऐवजी आवश्यक त्या उपाययोजना करून तो पूर्ववत सुरू ठेवावा, उपाययोजना करताना आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
दरम्यान, आठवडा बाजार बाबत अन्य निवेदन ही प्राप्त आहेत. मालवण शहरातील नागरिक, व्यापारी सर्वजण आपले आहेत. सर्वांचा विचार करून योग्य आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका निना मुंबरकर यांनीही याचं पद्धतीने भूमिका मांडली.
मालवण नगरपरिषद सभागृह येथे नागरिकांनी निवेदन सादर केले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव, प्रशासकीय अधिकारी गवळी मॅडम, नगरसेवक ललित चव्हाण, नगरसेविका निना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर आदी लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. तसेच देऊळवाडा व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित नागरिकांच्या वतीने ॲड. अक्षय सामंत व अन्य उपस्थित नागरिक प्रतिनिधी यांनी भूमिका मांडली. उपस्थित सर्वांनी या भूमिकेला पाठिंबा दिला.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देऊळवाडा येथे सुमारे सहा वर्षांपासून आठवडा बाजार नियमित भरत असून आजपर्यंत नागरिक किंवा ग्राहकांकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. काही व्यक्तींनी वाहतूक कोंडी व इतर कारणे पुढे करून बाजार बंद करण्याची मागणी केली असली, तरी ती सर्वसामान्य नागरिकांच्या हिताची नसल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
देऊळवाडा येथील बाजार हा मालवण शहरासह कोळंब, निव्हे, आडारी, कातवड, खैदा, कुंभारमाठ, घुमडे, वायरी, देवळी, तारकर्ली, देवबाग, हडी, कांदळगाव, ओझर आदी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना या बाजारात सहज ये-जा करता येत असल्याने हा बाजार त्यांच्या दैनंदिन गरजांचा महत्त्वाचा भाग बनला आहे.
नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, आठवडा बाजार केवळ काही तासांसाठी भरतो आणि विक्रेत्यांची संख्याही मर्यादित असते. बाजाराच्या दिवशी अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविणे, आडारी मार्गाचा वापर करणे, वाहतुकीचे योग्य नियोजन करणे अशा उपाययोजना प्रशासनाने केल्यास वाहतुकीचा प्रश्न सहज सोडविता येऊ शकतो. त्यामुळे केवळ वाहतुकीचे कारण पुढे करून बाजार बंद करणे योग्य ठरणार नाही.
याशिवाय बाजाराच्या दिवशी सागरी महामार्गालगत भाजीपाला, फळे, फुले व इतर शेतीमाल विकणाऱ्या विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागा उपलब्ध करून द्यावी तसेच त्यासाठी आवश्यक नियमावली तयार करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, या बाजारात प्रामुख्याने शेतकरी व लहान विक्रेते आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे इतर व्यापाऱ्यांवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. त्यामुळे हा बाजार बंद करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या हितालाच बाधा पोहोचविणारे ठरेल.
देऊळवाडा येथील बाजाराच्या परिसरात एस.टी. स्थानक, रिक्षा स्थानक आणि बसथांबे असल्यामुळे नागरिकांचा वेळ व प्रवास खर्च वाचतो. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
गेल्या सहा वर्षांत या बाजारात कोणतीही अनुचित घटना, पाकीटमारी किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची नोंद नसल्याचे सांगत, हा बाजार पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला आवाहन करताना म्हटले आहे की, देऊळवाडा येथील आठवडा बाजार हा सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विषय असून काही व्यक्तींच्या मागणीवरून तो बंद करण्याचा निर्णय घेऊ नये. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी व्यापक जनमत जाणून घ्यावे. तसेच या प्रकरणात विक्रेत्यांपेक्षा ग्राहकहिताला प्राधान्य देऊन बाजार पूर्ववत सुरू ठेवावा.
दरम्यान, या निवेदनाची प्रत मालवण तहसीलदार यांनाही सादर करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले असून, लोकहिताचा विचार करून देऊळवाडा येथील आठवडा बाजार कायम सुरू ठेवावा, अशी नम्र पण ठाम मागणी करण्यात आली आहे.
▪️अमित खोत | मालवण
▪️सर्व छायाचित्र : गणेश गांवकर, देऊळवाडा मालवण

