मालवण : रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांचे स्वागत प्रा. खान यांनी केले. त्यानंतर विद्यार्थिनी पल्लवी सामंत हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सर्व प्राध्यापकांना गुलाबपुष्प अर्पण करून गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. प्रभारी प्राचार्य के. के. राबते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. तसेच कवी फ. मु. शिंदे यांच्या ‘आई’ या कवितेतील मातृत्वाचे श्रेष्ठत्व आणि कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ या कवितेतील स्वाभिमान, आत्मसन्मान, जिद्द व संकटांशी खंबीरपणे सामना करण्याचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला.
यावेळी प्रा. खान, प्रा. स्नेहा बर्वे आणि प्रा. मिलन सामंत यांनीही विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांपैकी जीवन नाईक, प्रज्ञा पवार, प्राची वेंगुर्लेकर आणि नमिता कदम यांनी मनोगत व्यक्त करून आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षिता गावकर हिने केले, तर आभारप्रदर्शन खुशी सावंत हिने केले. कार्यक्रमासाठी आकर्षक व उत्कृष्ट फलकलेखन धनश्री गावडे आणि सृष्टी कदम यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
