विद्यार्थ्यांनी पाद्यपूजन, अभंग, मनोगते आणि नाटिकेतून जपली गुरु-शिष्य परंपरेची पवित्र परंपरा
"गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा पाया आणि जीवनाला योग्य दिशा देणारे दैवत" — केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर
मसुरे : "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः..." या मंत्राचा प्रत्यय देणारा अत्यंत भावपूर्ण आणि संस्कारमय गुरुपौर्णिमा सोहळा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, केंद्रशाळा मसुरे नं. १ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता, आदर आणि प्रेम व्यक्त करत पाद्यपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, अभंग, मनोगते आणि नाटिकेच्या माध्यमातून गुरु-शिष्य नात्याचा पवित्र भाव जिवंत केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वेदव्यास आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पाद्यपूजन करून त्यांच्या चरणी कृतज्ञतेची भावपूर्ण वंदना अर्पण केली. विद्यार्थ्यांच्या या कृतीने उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि संपूर्ण वातावरण भावनिक झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना मसुरे केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर म्हणाले, "गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून गुरु-शिष्य परंपरेच्या अमूल्य नात्याचा गौरव करणारा दिवस आहे. महर्षी वेदव्यासांनी मानवजातीला ज्ञानाचा अनमोल ठेवा दिला. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे स्वरूप मानले जाते. गुरु हा केवळ शिक्षण देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा, संस्कारांची शिदोरी देणारा आणि जीवनाला योग्य दिशा दाखवणारा खरा मार्गदर्शक असतो."
कार्यक्रमात अनुश्री बागवे, अलीया शेख, आयान शेख, गौरांग दुखंडे, जयश्री जंगले, लावण्या दुखंडे, आरोही दुखंडे, सार्थक परब, अन्वयी बांदिवडेकर, वैभवी शिंगरे, जोबीया सय्यद, मानसी मुळ्ये, मुस्कान खान, वैष्णवी तोंडवळकर, गौरवी गुरव, समर्थ शिंगरे, रमेश मुळ्ये, निधी पेडणेकर आणि निव्या नाईक साटम या विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महतीवर प्रभावी मनोगते व्यक्त करत गुरुंचे जीवनातील स्थान अधोरेखित केले.
कोमल मोंडकर, मानवी शिंगरे, जोबीया सय्यद, मानसी मुळ्ये, मुस्कान खान, वैष्णवी तोंडवळकर, समर्थ शिंगरे, रमेश मुळ्ये, जान्हवी गिरकर, हमजा सय्यद आणि सार्थक परब यांनी "गुरुने दिला ज्ञानरूपी वसा" हा अभंग सादर करून वातावरण भक्तिरसाने भारावून टाकले.
ग्रथिक कातवणकर, समर्थ शिंगरे आणि संजय राज सावंत यांनी संगीत साथ देत सादरीकरण अधिक प्रभावी केले.
आठवीच्या विद्यार्थ्यांनी संत एकनाथ महाराजांच्या जीवनावर आधारित गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिशा दुखंडे आणि लतिफाबी सय्यद यांनी केले, तर सुरज मसूरकर यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी मसुरे केंद्राचे केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर, शाळेचे मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर, शिक्षक सुजाता वेडेकर, विजय सरोदे, प्रगती मोरे, हेमलता दुखंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समेश मसुरेकर, उपाध्यक्ष संस्कृती बांदिवडेकर, शिक्षणतज्ज्ञ ज्योती पेडणेकर तसेच माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत, अशा संस्कारमय उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
गुरुपौर्णिमेचा हा सोहळा केवळ उत्सव म्हणून न साजरा करता, "गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचे मंदिर आणि जीवनाला योग्य दिशा देणारे दैवत" हा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणारा ठरला. मसुरे नं. १ शाळेने गुरु-शिष्य परंपरेचा अमूल्य वारसा जपत समाजासमोर संस्कार, श्रद्धा आणि कृतज्ञतेचा आदर्श निर्माण केला.
▪️अमित खोत | मालवण

केंद्रशाळा मसुरे नं. १ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी | गुरूंच्या चरणी कृतज्ञतेचा भावस्पर्शी वंदन सोहळा
