नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी कार्ड घेऊन जावे : वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मालवण शहरातील ज्या लाभार्थ्यांनी आपली 'आयुष्मान कार्डे' काढली होती, त्या सर्व लाभार्थ्यांची छापील कार्ड मालवण ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध झाली आहेत. तरी संबंधित नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात येथे संपर्क साधून आपली कार्डे घेऊन जावीत, असे आवाहन मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी केले आहे.
'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' ही गरिबांसाठी आणि गरजूंसाठी अत्यंत दिलासादायक ठरत आहे. या कार्डाद्वारे पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळतात. मालवण शहरी भागातील अनेक नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. या नोंदणीकृत लाभार्थ्यांची मूळ कार्डे आता रुग्णालयात जमा झाली आहेत.
नागरिकांनी मालवण ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि आपले आयुष्मान कार्ड प्राप्त करून घ्यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत या योजनेचा लाभ घेता येईल.

मालवण ग्रामीण रुग्णालयात 'आयुष्मान कार्डे' उपलब्ध
